Join us
Daily Top 2Weekly Top 5

Til Lagvad : सुधारित तंत्रज्ञान वापरा, तिळाचे प्रति हेक्टरी 10 क्विंटल उत्पादन मिळवा, असे करा व्यवस्थापन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:49 IST

Til Lagvad : शेतकऱ्यांचा कल पाहता तीळ पीक (Sesame Crop Management) आता खरिप हंगामासोबतच उन्हाळी हंगामाचे प्रमुख पीक होत आहे.

Til Lagvad : एकंदरीत शेतकऱ्यांचा कल पाहता तीळ पीक (Sesame Crop Management) आता खरिप हंगामासोबतच उन्हाळी हंगामाचे प्रमुख पीक होत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Fule Krushi Vidyapith) द्वारा प्रसारित होऊन केंद्रीय समितीद्वारा नुकतीच नोटिफाय झालेली उन्हाळी हंगामासाठीची तीळ फुले (Til Lagvad) पूर्णा बियाणे उपलब्ध आहे. उन्हाळी हंगामासाठी पेरणीपासून ते काढणीपर्यंतचे संपूर्ण नियोजन पाहणार आहोत... 

पेरणीचे व्यवस्थापन 

  • लागवड करताना बीज प्रक्रिया करण अत्यंत गरजेचं आहे. 
  • बियाणापासून व जमिनीमधून उद्भवणारे बुरशीजन्य रोग होऊ नये, म्हणून तीन ग्रॅम थायरम किंवा अडीच ग्रॅम कार्बेंडेंज़िम (Carbandenzim) किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर प्रति किलो बियाणास चोळावे. 
  • त्यानंतर पेरणीपूर्वी पीएसबी culture 25 ग्रॅम  प्रति किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी. 
  • पेरणी शक्यतो 15 फेब्रुवारीच्या आत पूर्ण करावी आणि बैल पांभरीनें 30 x 15 सेंटीमीटर किंवा 45 x 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. 
  • पेरणी करताना बियाणे अडीच ते तीन सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  • बियाणे जास्त खोलवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो. 
  • बियाणे तिफनने पेरताना शक्यतो एक किलो मध्ये एक किलो दाणेदार खत किंवा शेणखत किंवा गांडूळ खत किंवा एक किलो भाजलेल्या बाजरीत पेरणी केल्यास आपल्याला विशिष्ट पाहिजे असलेल्या अंतरावर पेरणी करता येते. 
  • पेरणीनंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली विरळणी आणि 15 ते 20 दिवसांनी दुसरी विरळणी करावी. 
  • पिकाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळवण्यासाठी हेक्टरी रोपांची संख्या 2.20  लाख प्रति हेक्टर इतकी ठेवावी. 
  • त्यासाठी पेरणी 45 सेंटिमीटर अंतरावर केलेली असेल तर दोन रोपातील अंतर 10 सेंटीमीटर ठेवावे.  
  • पेरणी तीस सेंटीमीटर अंतरावर केलेली असेल तर दोन रोपातील अंतर 15 सेंटीमीटर ठेवावे. 

 

खत व्यवस्थापन करताना

  • खत व्यवस्थापन करताना तीळ पिकास चांगले कुजलेले शेणखत पाच टन प्रति हेक्टर किंवा एरंडी पेंड एक टन प्रति हेक्टर कुळवणी अगोदर जमिनीत चांगले मिसळून द्यावे. 
  • रसायनिक खते द्यावयाची असल्यास तीळ पिकास नत्र 60 किलो प्रति हेक्टर स्फुरद 40 किलो प्रती हेक्टर आणि पोटॅश 20 किलो प्रति हेक्टर ह्याप्रमाणे पेरणी करताना द्यावे. 
  • नत्राची अर्धी मात्रा म्हणजेच 30 किलो देण्यासाठी 63 किलो युरिया पेरणी करताना द्यावा तर उर्वरित मात्रा पेरणीनंतर 21 दिवसांनी द्यावी. 
  • नत्राची दुसरी मात्रा दिल्यानंतर पीकास पाणी द्यावे. 
  • अधिक उत्पादननासाठी पीक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असताना दोन टक्के युरियाची फवारणी केल्यास फायदा होतो. 
  • हेक्टरी दहा किलो सल्फर जमिनीमधून दिल्यास या पिकास त्याचा अधिक फायदा होत असल्याचं निर्देशनास आलेले आहे. 
  • तीळ पीक सुरुवातीच्या काळामध्ये फार हळू वाढते, रोप अवस्थेमध्ये हे पीक अत्यंत नाजूक असून पिकाबरोबर वाढणाऱ्या तणा बरोबर पाणी अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करू शकत नाही. 
  • साधारणपणे सुरुवातीचा 35 ते 40 दिवसाचा कालावधी हा स्पर्धाक्षम असल्याने सुरुवातीच्या काळात तन नियंत्रण होणे आवश्यक आहे. 
  • त्यासाठी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी व निंदणी, तर 30 ते 35 दिवसांनी दुसरी कोळपणी व गरजेनुसार निंदनी करून पीक तण विरहित ठेवावे. 
  • तीळ पिकाची मुळे ही तंतू मुळे असल्याने जमिनीच्या वरच्या थरात वाढत असल्याने खोल अंतर मशागत केल्यास  मुळाना इजा पोहोचते. 
  • पीक लहान असताना अंतर मशागत करावी. 

 

पाणी व्यवस्थापन करताना

  • पाणी व्यवस्थापन करताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. 
  • कारण तीळ पाण्यासाठी फारच संवेदनशील आहे. 
  • तिळाचे पीक हे पाण्याचा ताण सहन करणारे असले तरी उन्हाळी हंगामात पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. 
  • पीक उगवण्यासाठी जमिनीत पुरेसी ओल असणे आवश्यक आहे. 
  • जमिनीच्या मगदूराप्रमाणे बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
  • पिकास फुले येण्याच्या तसेच बोंडे धरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पडू देऊ नये. 
  • तीळ पिकास उन्हाळी हंगामामध्ये पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 

 

पिक संरक्षणासाठी... 

  • पिक संरक्षणाच्या बाबतीत तीळ पिकावर प्रामुख्याने पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी व गादमाशी तसेच रस शोषण किडी, तुडतुडे कोळी व पांढरी माशी याचा प्रादुर्भाव दिसून येतो. 
  • या किडींच्या बंदोबस्तासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 
  • किंवा क्विनॉलफॉस (Quinolphos) कीटकनाशक दोन मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी घ्यावी. 
  • तसेच तीळीवर पर्णगुच्छ, मर, खोड व मुळकुज, भुरी हे रोगप्रमुखांनी आढळून येतात. 
  • रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाणास बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. 
  • रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅन्कोझेब 1250 ग्रॅम किंवा कॉपर ऑफ क्लोराईड 1500 ग्रॅम प्रति पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • रोगग्रस्त झाडे अथवा भाग गोळा करून नष्ट करावा. 

 

पीक काढणीची वेळ 

  • पीक साधारणता 80 ते 85 दिवसाच्या पुढे बोंडे आणि पाने पिवळसर दिसू लागल्यावर पिकाची कापणी करावी. 
  • कापणी झाल्यावर पेंढ्या बांधाव्यात, बांधलेल्या पेंड्या शक्यतो शेतात ताडपत्रीवर किंवा खळ्यावर पाच ते सहा पेंढ्यांची खोपडी करून उन्हात चांगल वाळू द्याव्यात. 
  • त्यानंतर पेंढ्या ताडपत्री वर उलट्या करून बियाण्याची झटकनी करावी. 
  • नंतर बियाणे स्वच्छ करावेत व चांगले वाळवून साठवावे. 
  • सुधारित तंत्रज्ञान वापरून तिळाची लागवड केल्यास 10 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळू शकते.

 

- प्रा.डॉ.सुमेरसिंग राजपूत, तीळ पैदासकार, तेलबिया संशोधन केंद्र  जळगाव.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनाशेतकरीपीक व्यवस्थापन