Summer Orchard Management : उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे फळबागेतील उत्पादनात घट होते आणि फळांचा दर्जा सुद्धा खालावतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.(Summer Orchard Management)
हे टाळण्यासाठी पाणी व्यवस्थापन, ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण, योग्य खत व्यवस्थापन, आणि कीड नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.(Summer Orchard Management)
पाणी व्यवस्थापन
उन्हाळ्यात झाडांना पाण्याचा ताण पडू शकतो, त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
ठिबक सिंचन
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि झाडांच्या मुळाशी गरजेनुसार ओलावा टिकवण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
पाणी देण्याची वेळ
बागेला पाणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर द्यावे. भर दुपारी पाणी दिल्यास बाष्पीभवनामुळे पाणी वाया जाते आणि झाडांना धक्का बसू शकतो.
आच्छादन (Mulching)
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झाडाच्या बुंध्यापाशी वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा प्लास्टिक फिल्मचा वापर करून आच्छादन करावे.
ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण
कडक उन्हामुळे झाडांची साल तडकणे किंवा पाने जळणे अशा समस्या उद्भवतात.
बोर्डो पेस्ट
प्रखर सूर्यकिरणांपासून खोडाचे संरक्षण करण्यासाठी फळझाडांच्या खोडाला जमिनीपासून २-३ फुटांपर्यंत बोर्डो पेस्ट (चुना आणि मोरचूद यांचे मिश्रण) लावावी.
सावलीची सोय
नवीन लावलेल्या लहान रोपांना उन्हाचा तडाखा अधिक बसतो, म्हणून त्यांना काठ्या आणि गोणपाटाच्या साहाय्याने सावली करावी.
वारा प्रतिबंधक झाडे
बागेचा गरम वाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी बागेच्या कडेने शेवरी किंवा सुरू सारखी उंच वाढणारी झाडे लावावीत.
खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन
उन्हाळ्यात झाडांची चयापचय क्रिया वाढलेली असते, त्यामुळे योग्य पोषणाची गरज असते.
सेंद्रिय खते
जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर करावा.
सूक्ष्म अन्नद्रव्ये
झाडांची रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी झिंक, लोह आणि बोरॉन यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
रासायनिक खते टाळा
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात रासायनिक नत्रयुक्त खते देऊ नयेत, कारण यामुळे झाडांना पाण्याची अधिक गरज भासू शकते.
छाटणी आणि स्वच्छता
हलकी छाटणी
झाडावरील वाळलेल्या किंवा रोगट फांद्या काढून टाकल्याने झाडाचा विस्तार मर्यादित राहतो आणि पाण्याची गरज कमी होते.
तण नियंत्रण व स्वच्छता
बागेतील तण वेळेवर काढावे, कारण ते झाडांच्या वाटणीचे पाणी आणि अन्नद्रव्ये शोषून घेतात. बागेतील पालापाचोळा आच्छादनासाठी वापरावा किंवा कंपोस्ट खड्ड्यात टाकावा.
कीड आणि रोग नियंत्रण
उन्हाळ्यात पांढरी माशी, तुडतुडे आणि कोळी यांसारख्या शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
नियंत्रण
किडींच्या नियंत्रणासाठी निम तेलाची किंवा शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
कामगंध सापळे : आंबा किंवा इतर फळांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कामगंध सापळे लावावेत.
(लेखक डॉ. अंगद प्र. गरडे, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था,कृषी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत.)
प्रा. अंकिता सं. काळे (गरडे).
मो. क्र. ८४०८८३८४५०. हे ही वाचा सविस्तर : Mango Farming Tips : अवकाळी पावसानंतर आंबा बाग वाचवायची? 'या' उपायांनी टळेल मोठं नुकसान!
Web Summary : Manage summer orchards effectively with water, shade, fertilizers, and pest control. Use drip irrigation, mulching, and organic fertilizers. Protect from heat with shade and timely pest management for healthy yields.
Web Summary : पानी, छाया, उर्वरक और कीट नियंत्रण से गर्मी में फल उद्यानों का प्रबंधन करें। टपक सिंचाई, मल्चिंग और जैविक उर्वरकों का प्रयोग करें। छाया और समय पर कीट प्रबंधन से गर्मी से बचाएं।