Shevga Sheti : शेवग्याचे झाड आणि शेंगा महाराष्ट्रात बहुतेक सर्वांच्या परिचयाचे आहे. शेवगा हे पीक बहुपयोगी आहे, कारण या झाडाची पाने, फुले, शेंगा भाजीसाठी वापरली जातात. कमी काळात, कमी पाण्यात अधिक उत्पादन क्षमतेमुळे या बहुवार्षिक भाजीपाला पिकांच्या लागवडीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
शेवग्याच्या सुधारित जाती
जाफना :
हा शेवगा वाण स्थानिक आहे. याला देशी शेवगा म्हणून ओळखतात. या वाणाच्या शेंगा चवदार असतात. या वाणाचे वैशिष्ट्य एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३० सें.मी. लांब असते. या वाणाला वर्षांतून एक वेळ म्हणजे फेब्रुवारीत फुले लागतात. मार्च, एप्रिल, मे मध्ये शेंगा मिळतात. एक किलोत २० ते २२ शेंगा बसतात. दर झाड एका हंगामात १५० ते २०० शेंगा लागतात.
रोहित - १ :
या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यात उत्पन्न सुरू होते. शेंगांची लांबी मध्यम प्रतीची ४५ ते ५५ सें.मी. असून, शेंगा सरळ, गोल असतात. रंग गर्द हिरवा असून, चव गोड असते. उपलब्ध सर्व जातींपेक्षा ३० टक्के उत्पन्न जास्त येते. व्यापारी उत्पन्न देण्याचा कालावधी ७ ते ८ वर्षांचा आहे. वर्षभरात एका झाडापासून सरासरी १५ ते २० किलो शेंगांचे उत्पन्न मिळते. शिवाय या जातीतून ८० टक्के शेंगा निर्यातक्षम गुणवत्तेच्या मिळतात.
भाग्या (के.डी.एम. ०१) :
कर्नाटक राज्यातील बागलकोट कृषी विद्यापीठाद्वारे ही जात प्रसारित केली असून ही जात बारमाही उत्पादन देणारी आहे. ४ ते ५ महिन्यात फलधारणा होत असून शेंगाची चव उत्तम आहे. प्रति झाड २०० ते २५० शेंगा प्रति वर्ष मिळतात.
कोकण रुचिरा :
हा वाण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषीविद्यापीठाने विकसित केला असून याची कोकणासाठी शिफारस केली आहे. झाडाची उंची ५ ते ६ मीटर असून याच्या एका झाडाला १५ ते १७ फांद्या, उपफांद्या येतात. शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असतात. या वाणाचे उत्पादन ओलीताखाली सर्वोत्तम येते. शेंगा एका देठावर एकच लागते. या वाणाला एकाच हंगामात शेंगा येतात. आकार मध्यम असल्यामुळे वजन कमी भरते. शेंगाची लांबी १.५ ते २ फुट असुन शेंगा त्रिकोणी आकाराच्या असतात. पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी ३५ ते ४० शेंगा मिळतात.
ओडिसी :
हा वाण देखील तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. हा वाण महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच आंतरपीक शेवगा शेतीत घेतला जातो.
पी. के. एम. १ :
हा वाण तमिळनाडू कृषी विद्यापिठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार असतो. शेंगा लवकर येतात. शेंगा दोन ते अडीच फुट लांब, पोपटी रंगाच्या, भरपूर व चविष्ट गराच्या असल्याने देशांतर्गत निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. या वाणात रोप लावणीनंतर ६ महिन्यात शेंगा सुरू होतात. या वाणाला महाराष्ट्रातील वातावरणात वर्षांतून २ वेळा शेंगा येतात.
- श्रीमती कांचन देवानंद तायडे, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमख डॉ. प्रशांत उंबरकर, विषय विशेषज्ञ, किटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा
