Rala Crop Farming : हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि वारंवार येणारा ओला-कोरडा दुष्काळ यामुळे पारंपरिक शेती करणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. (Rala Crop Farming)
अशा परिस्थितीत कमी पाण्यात, अगदी खडकाळ आणि मुरमाड जमिनीतही चांगले उत्पादन देणारे 'राळा' (भरडधान्य) हे पीक आशेचा किरण ठरत आहे.(Rala Crop Farming)
अवघ्या अडीच ते तीन महिन्यांत येणारे हे पीक कमी गुंतवणुकीत खात्रीशीर उत्पन्न देणारे असल्याने जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे वळताना दिसत आहेत.(Rala Crop Farming)
बाजारभाव किती?
सध्या बाजारात राळ्याला चांगली मागणी आहे.
प्रक्रियेविना राळा : ३,५०० ते ५,००० रु. प्रति क्विंटल
प्रक्रिया करून तांदूळ स्वरूपात विक्री : ८० ते १०० रु. प्रति किलो
प्रक्रिया केल्यास मूल्यवर्धनातून अधिक नफा मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी गटांनी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (FPO) प्रक्रिया यंत्रणा उभारल्यास उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते.
कमी खर्च, जास्त नफा
रासायनिक खतांची विशेष गरज नाही
किड-रोगांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी
घरचे बियाणे वापरता येते
पाण्याची गरज कमी
अल्प खर्चात उत्पादन होत असल्याने जोखीमही कमी राहते. विशेषतः हलकी, मुरमाड आणि कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर ठरते.
७५ ते ९० दिवसांत कापणी
राळ्याचे पीक साधारण ७५ ते ९० दिवसांत तयार होते. खरीप हंगामाच्या सुरुवातीला (जून-जुलै) पेरणी करावी. पाण्याची सोय असल्यास उन्हाळी हंगामातही घेता येते.
पेरणी पद्धत
दोन ओळींतील अंतर २५ ते ३० सेंमी
बियाणे बारीक असल्याने जास्त खोल पेरणी टाळावी
सुपरफूड म्हणून वाढती मागणी
आहारतज्ज्ञांच्या मते राळा हे पोषणमूल्यांनी समृद्ध धान्य आहे.
फायबर : पचनासाठी उपयुक्त
लोह : रक्ताल्पता कमी करण्यास मदत
प्रथिने : शरीराच्या वाढीसाठी आवश्यक
कमी ग्लायसेमिक इंडेक्स : मधुमेहींसाठी लाभदायक
आरोग्याबाबत वाढती जागरूकता लक्षात घेता भरडधान्यांची मागणी वाढत असून, शासनाकडूनही यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
राळा हे पीक अधिक नफा देणारे
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अनुकूल आणि कमी खर्चिक पिकांकडे वळण्याची गरज आहे. राळा हे पीक कमी खर्चात अधिक नफा देणारे असून हलकी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. - भरत नागरे, मंडळ अधिकारी
आर्थिक क्रांतीची संधी
जालना जिल्ह्यातील अनेक भागांत कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने पारंपरिक पिकांमध्ये मोठी जोखीम आहे.
अशा परिस्थितीत राळा हे पीक शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न देऊ शकते. कमी गुंतवणूक, अल्प कालावधी आणि खात्रीशीर बाजारपेठ यामुळे भरडधान्य शेतीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खडकाळ जमिनीतही दमदार उत्पादन देणारा राळा शेतकऱ्यांसाठी 'स्मार्ट शेती'चा नवा मार्ग ठरत आहे.
