Rabbi Jwari Perani : पेरणीचा हंगाम जवळपास संपलेला आहे. तथापि, अपरिहार्य परिस्थितीत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येते. परंतु खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो, त्यासाठी पेरणीपूर्वी थायमेथोक्झाम (३० एफएस) १० मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
काणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघविळणाऱ्या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
रब्बी ज्वारी पेरणीसाठी फुले माऊली, फुले अनुराधा, परभणी मोती या वाणांची निवड करावी. एकरी ४ किलोऐवजी ६ किलो बियाणे वापरावे. पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एक रोप ठेवावे व पेरणीनंतर ३ आठवड्यांने फटीच्या कोळप्याने पहिली कोळपणी करावी.
दुसऱ्या पंधरवड्यात खोडकिडाचा प्रादुर्भाव दिसल्यास क्विनालफॉस २५ ईसी ७५० मिली प्रवाही ५०० लीटर पाणी हेक्टरी फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पहिली खुरपणी करावी. पेरणीनंतर ८ आठवड्याने दातेरे कोळप्याने दुसरी कोळपणी करावी आणि गरज असल्यास पहिले संरक्षित पाणी द्यावे.
सूचना : पाण्याची उपलब्धता असल्यास चाऱ्यासाठी ओट, बरसीम, लसूणघास यांची पेरणी करावी व मर्यादित पाणी असल्यास रब्बी ज्वारी (फुले अनुराधा व फुले सुचित्रा) पिकाची चाऱ्यासाठी पेरणी करावी.
हेही वाचा : लाईटबीलावरून तुम्ही किती लाईट किंवा वीज वापरली हे समजेल, वाचा सविस्तर
