संत्रा व मोसंबी बागायतदारांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. रस शोषणारा पतंग या फळांना छिद्र करून त्यातील रस काढून घेतो आणि फळे विक्रीस अयोग्य करतो.
या कीटकामुळे उत्पादनात मोठी घट होत असून शेतकरी चिंतेत आहेत. मात्र योग्य उपाययोजना करून या कीटकाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येऊ शकतो.
संत्रा व मोसंबी ही महाराष्ट्रातील प्रमुख फळपिके आहेत. या पिकांना विविध प्रकारचे कीड-रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामध्ये फळातील रस शोषणारा पतंग (Fruit Sucking Moth) हा एक महत्त्वाचा कीडशत्रू आहे. या पतंगामुळे फळांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
नुकसानाची लक्षणे
हा पतंग मोसंबी व संत्रा फळांना छिद्र करून त्यातील रस शोषून घेतो.
अशा फळांवर तपकिरी डाग दिसतात व रस निघाल्यानंतर फळ कोमेजून जाते.
रस शोषल्याने फळांमध्ये कुज येते व फळ बाजारात विक्रीस अयोग्य बनते.
फळांची चव, रंग व वजन यावर थेट परिणाम होतो.
अनेकदा फळे जमिनीवर गळून पडतात व उत्पादनात थेट घट होते.
एकात्मिक व्यवस्थापन उपाययोजना
फळांची सफाई व बांधणी
अंडी, अळी व कोषाला पूरक असणारी फळे तसेच बागेत पडलेली फळे त्वरित जमा करून जमिनीत पुरावीत.
वासरवेल, चांदवेल आदी वेलवर्गीय पिके बागेतून काढून टाकावीत.
फवारणी व फळांचे संरक्षण
संध्याकाळी बागेत धूर करावा, त्यामुळे पतंग दूर पळतो.
झाडावरील पिकलेली केळी बागेत ठेवून त्यावर आकृष्ट झालेल्या पतंगांना पकडून नष्ट करावे.
फळ हिरवे रंगांधून पिवळसर रंगात रूपांतर होत असताना १० ते १५ दिवसांच्या अंतराने नीम तेल (१० मिली/लिटर पाणी) फवारावे.
प्रकाश सापळे
बागेमध्ये प्रकाश सापळे लावावेत. प्रकाशाकडे आकर्षित झालेले पतंग पकडून नष्ट करावेत.
रासायनिक उपाय
मलेथिऑन (१०० मिली) + गुर (१०० ग्रॅम) + फळांचा रस (१०० मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून आमिष तयार करावे.
हे आमिष झाडामध्ये भांड्यात ठेवून पतंगांना आकर्षित करून नष्ट करता येते.
शेतकऱ्यांसाठी संदेश
फळांचे नुकसान टाळण्यासाठी पतंगाचा प्रादुर्भाव आढळताच एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. जैविक उपाय, नीम तेल फवारणी, प्रकाश सापळे व रासायनिक आमिष या सर्वांचा एकत्रित वापर करून फळांचे रक्षण केल्यास चांगले उत्पादन व गुणवत्ता राखता येते.
(सौजन्य : फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप), किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)