Join us
Daily Top 2Weekly Top 5

Melghat Coffee Story : महाराष्ट्रात १५० वर्षांची कॉफी परंपरा; मेळघाटात दरवळतो 'अरेबिका'चा सुगंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 10:11 IST

Melghat Coffee Story : कॉफी म्हटलं की डोळ्यासमोर येतात कर्नाटक किंवा केरळ. पण तुम्हाला माहिती आहे का, विदर्भातील चिखलदरा येथे तब्बल दीडशे वर्षांपासून ‘अरेबिका’ कॉफीची लागवड होते? मेळघाटच्या कुशीत दरवळणाऱ्या या कॉफीचा इतिहास, आव्हाने आणि भविष्यातील संधी जाणून घेऊया… (Melghat Coffee Story)

नरेंद्र जावरे

कॉफीची लागवड आणि तीही महाराष्ट्रात ? ऐकून जरा अचंबित व्हायला होईल. पण हे खरे आहे. महाराष्ट्रात विदर्भातील चिखलदरा येथे कॉफीची लागवड होते. तीही थोडयाथोडक्या नव्हे, तर दीडशे वर्षांहून अधिक काळापासून.(Melghat Coffee Story)

चिखलदऱ्यातील कॉफीचा इतिहास हा ब्रिटिश कालीन आहे. प्रयोग म्हणून १८६१ मध्ये ब्रिटिश अधिकारी जेम्स मुल्हेरन यांनी केरळमधून कॉफीची काही रोपे आणून आपल्या 'मुल्हेरन कॉटेज' या बंगल्याच्या आवारात लावली, महत्त्वाचे म्हणजे येथील हवामान रोपांना मानवले आणि कॉफीची लागवह विस्तारत गेली.(Melghat Coffee Story)

अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट या आदिवासीबहुल भागातील चिखलदरा येथील 'अप्पर प्लॅटो'वर कॉपीचा सुगंध दीर्घ काळापासून दरवळत आहे.(Melghat Coffee Story)

खटकाली येथील आदिवासी शेतकरी प्रकाश जामकर यांनी दोन एकरांत कॉफीची बाग तयार केली आहे. त्यांच्या प्रयोगाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केला होता, हे विशेष, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या बागांच्या पुनरुजीवनासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले आहे. सिडकोच्या आराखड्यात कॉफीसाठी १०० हेक्टर क्षेत्र आरक्षित आहे.(Melghat Coffee Story)

ही प्रजाती कोणती?

चिखलदरा येथे उत्पादित होणारी कॉफी 'अरेबिका' जातीची आहे. चिखलदरा समुद्रसपाटीपासून ३,६६४ फूट उंच आहे.

कॉफीच्या झाडांना थेट ऊन सहन होत नाही. त्यामुळे वड, जांभूळ, हलर सदाहरित वृक्षांच्या सावलीत येथे कॉफी बहरते.

२४० एकरांवर एकेकाळी कॉफी लागवड

६०० हेक्टर क्षेत्र सावलीच्या व्यापले

१७ हेक्टरवर सध्या लागवड होते

१५ टन उत्पादनाचा यंदाचा अंदाज

चिखलदऱ्याचे वातावरण 'अरेबिका कॉफी'साठी सर्वोत्तम असल्याचा निर्वाक्षा १२२६ मध्ये कर्नाटक व केरळ कॉफी बोर्डाच्या तज्ज्ञांनी दिला होता.

युरोपीयन बागायतदारांना आकर्षण

१८९७-९८ मध्ये चिखलदऱ्यात रोमन कॅथलिक मिशन सुरू झाले होते. फादर थेवनेट यांनी आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी कॉफीची लागवड केली.

१९१० पर्यंत मरियमपुर येथील १०० एकरांत कॉफीचे मळे विकसित केले. ब्रिटिश अधिकारी ए. ई. नेल्सन व बॅचनर अर्नेस्ट यांच्या नोंदीनुसार, येथे चहा-कॉफीचे मोठे खासगी मळे होते आणि युरोपच्या बागायतदारांना त्या मळ्यांनी आकर्षित केले होते.

१९६५ पर्यंत चिखलदऱ्यातून ट्रक भरून कॉफी मद्रासव्या पोल्सन कंपनीकडे पाठविली जात असे.

आव्हाने कोणती?

१. प्रक्रिया केंद्राचा अभाव : कॉफी फळांची पावडर तयार करण्यासाठी येथे प्रक्रिया केंद्र नाही.

२. शासकीय उदासीनता : ब्रिटिश गेल्यानंतर नवीन बागा लावण्याचे शासकीय प्रयत्न झाले नाहीत.

३. रोजगाराच्या संधी : कॉफीच्या मळ्यातून काही आदिवासींना रोजगार मिळतो. व्याप्ती वाढवल्यास अधिक रोजगार मिळेल.

कशी होते कॉफी तयार?

या कॉफीची चव न्यारी आहे. पण ती बाजारात उपलब्ध कॉफीसारखी नाही. चहापत्तीप्रमाणे दुधात साखर आणि ही कॉफी घालून उकळून बनविण्याची पद्धत आहे. त्यामुळे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक असा स्वाद येतो, हे विशेष आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farmer to Entrepreneur : शेतीत नफा हवा? तर शेतकऱ्यांनो, उद्योजक बना! वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Melghat Coffee: A 150-Year-Old Tradition in Maharashtra, Aroma of 'Arabica'.

Web Summary : Coffee cultivation thrives in Maharashtra's Chikhaldara since 1861. 'Arabica' variety grows under shade trees. Despite challenges like processing facility absence, Melghat shows immense coffee-growing potential. An estimated 15 tons of coffee will be produced this year.
टॅग्स :शेती क्षेत्रविदर्भमेळघाटपीकशेतकरीशेती