Grape Downy Mildew : बऱ्याच बागेत छाटणीनंतर प्री-ब्लूम अवस्थेत घडकुज व डाऊनी मिल्ड्यूची समस्या दिसून येते. फळछाटणीनंत्र बागेत आपण वेलीच्या प्रत्येक काडीवर साधारण चार चार ते पाच डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग करतो. इथेफॉनचा वापर केल्यामुळे डोळे चांगले फुगलेले असतात. त्यामुळे सर्वच डोळे फुटून निघतात. यानंतर घड पाच पानांच्या अवस्थेत स्पष्टपणे दिसून येतो.
ही अवस्था फळछाटणीनंतर साधारणपणे चौदाव्या दिवसानंतर दिसून येते. या कालावधीत् फेलफुटी काढण्याला प्राधान्य दिले जाते. वाढीच्या या अवस्थेत पाऊस जास्त प्रमाणात झालेला असल्यास बागेत अचानक आर्द्रता वाढते. प्री-ब्लूम घड अवस्थेत पाऊस झाल्यास या छोट्याशा कॅनॉपीमध्ये आर्द्रता वाढू शकते. दोन ओळींमध्ये असलेली मुळे पाऊस झाल्यामुळे कार्यरत होतात. मुळांद्वारे ऑक्झिन्सची उत्पत्ती जास्त होत असल्यामुळे वेलीमध्ये अंतर्गत जिबरेलिन तितक्याच प्रमाणात वाढू लागते.
परिणामी, पानांची लवचिकता वाढून वेल अशक्त होतात. प्री-ब्लूम किंवा दोडा अवस्थेत असलेल्या घडांवर पाण्याचे थेंब साचून राहिल्यास कुर्जेला बळी पडतात. बऱ्याचदा रात्री झालेल्या पावसानंतर सकाळी बागेत संपूर्ण घड कुजलेले दिसू शकतात.बऱ्याच बागेत पावसाळी वातावरणात गवतही जास्त वाढते. पाऊस झाल्यानंतर या गवतामुळे जमिनीवरील भागात आर्द्रता जास्त काळ टिकून राहते.
ओलांडा ते जमीन हे अंतर कमी असते. ढगाळ वातावरणात हवाही खेळती राहत नाहीत. या दोन्ही गोष्टींमुळे आर्द्रता अधिकच वाढते. हे डाऊनी मिल्ड्यूच्या प्रादुर्भावासाठी पोषक ठरते. ही परिस्थिती दाट कॅनॉपी असलेल्या ठिकाणी हमखास दिसून येते. कुज आणि डाऊनीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कॅनॉपीवर लक्ष देणे आवश्यक आहे.
यावर पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील :
- घड स्पष्टपणे दिसताच् फेलफुटी त्वरित काढून घ्याव्यात.
- वेलीवर झिंक आणि बोरॉन प्रत्येकी ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी.
- पालाश (०-०-५०) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी. यामुळे वेल सशक्त होण्यास मदत होईल.
- एखादे सायटोकाय्नीनयुक्त संजीवक कमी प्रमाणात फवारून घ्यावे.
- पाऊस जास्त झालेल्या प्रिस्थितीत ओलांडा किंवा खोडावर चाकूने जखम करावी.
- त्यामुळे सायटोकायनीनची पातळी वाढण्यास मदत होते.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी