Krushi Salla : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा परिसरात हवामानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. उन्हाच्या झळांमधून सुटका होत असली तरी अवकाळी मात्र पाठ सोडत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गास काळजी घेणे अत्यावश्यक ठरत आहे. मराठवाडा विभागात पुढील काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामानाच्या या बदलत्या परिस्थितीचा परिणाम पिके, फळबागा आणि जनावरांवर होऊ नये म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञांनी विशिष्ट कृषी सल्ला दिला आहे.
२२ ते २३ मे दरम्यान संभाजीनगर, बीड, जालना आणि मराठवाड्याच्या इतर भागांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान बदलामुळे मराठवाड्यात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमानातही हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. यामुळे वातावरणात थोडेसा गारठा जाणवू शकतो.
महत्त्वाची सूचना
वादळी वाऱ्याचा वेग ताशी ५० -६० कि.मी. पर्यंत जाऊ शकतो, त्यामुळे काढणीस असलेले पीक व भाजीपाला लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी ठेवावे. हलक्या वाऱ्यांमध्ये उडणाऱ्या साधनसामग्रीची योग्य रचना करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
पिक व्यवस्थापन
* काढणीस तयार असलेले उन्हाळी मूग, उडीद, भुईमूग व भाजीपाला तातडीने काढून सुरक्षित साठवणीची व्यवस्था करावी.
* खरीप पिकांसाठी (कापूस, तूर, मका आदी) मध्यम ते भारी, निचऱ्याची चांगली जमिन निवडावी.
* पावसामुळे पाणी साचू नये, यासाठी निचरा व्यवस्थापन करावे.
फळबाग व्यवस्थापन
* केळी, आंबा, द्राक्ष अशा बागांमध्ये ठिंबक सिंचन व सावलीची व्यवस्था करावी.
* रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व फवारणी वेळेवर करावी.
* झाडांच्या खोडाजवळ आच्छादन (मल्चिंग) करावे.
पशुधन संरक्षण
* जनावरे उघड्यावर बांधू नयेत, त्यांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवावे.
* पावसात भिजू नयेत याची काळजी घ्यावी.
* पिण्याच्या पाण्यात पावसाचे पाणी मिसळू देऊ नये.
* उष्णतेपासून संरक्षणासाठी गोठ्याचे आच्छादन करावे, जनावरांना थंड व स्वच्छ पाणी द्यावे.
* जनावरे चरायला बाहेर नेऊ नये.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)
हे ही वाचा सविस्तर : Guava Pruning: पेरू बागांचे अधिक उत्पादनासाठी योग्य छाटणी तंत्र! वाचा सविस्तर