Join us

Kanda Kadhani : कांदा काढणीनंतर किती दिवस शेतात सुकवावा आणि का? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:55 IST

Kanda Kadhani : कांदा काढणीवेळी आणि नंतर कसे व्यवस्थापन कसे करावे, हे जाणून घेऊया..

Kanda Kadhani : काही भागात कांदा काढणीला (Onion harvesting) हात लावण्यास सुरवात झाली आहे. अशावेळी कांदा काढणीदरम्यान आणि काढणीनंतर काय काळजी घ्यावी? जेणेकरून साठवणुकीसाठीचे नियोजन करता येईल. कांदा अधिक काळ (kanda Sathvanuk) टिकण्यासाठी काय व्यवस्थापन करावे, हे समजून घेऊया... 

कांदा काढणीवेळी व नंतर 

  • पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा. अन्यथा मान जास्त वाळली, तर ती कांदा उपटताना तुटतेय, परिणामी कांदा कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा लागतो, त्यामुळे खर्च वाढतो. 
  • कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह दोन ते तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. 
  • प्रत्येक वाफ्यातील कांदा अशा रीतीने ठेवावा, की दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. 
  • तीन दिवस शेतामध्ये सुकल्यानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब नाळ (मान) ठेवून कापावी. 
  • नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत. 
  • उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत दहा ते बारा दिवस राहू द्यावेत. 
  • या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. 
  • वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहज प्रवेश होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.

कांदा पिक सल्ला - 

सकाळी थंड व दिवसा उष्ण हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी टेब्यूकोनाझोल (फॉलिक्युअर ) या बुरशीनाशकची १ मिली/लि किंवा प्रोपिकोनाझोल (टील्ट) १ मिली/लि किंवा डायफेनकोणाझोल (स्कोर) १ मिली/ली पाण्याचे प्रमाण घेऊन यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी घ्यावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी, तसेच कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव.  

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डपीक व्यवस्थापन