Join us

Kanda Crop Management : ढगाळ वातावरणामध्ये कांदा रोपवाटिका व पिकाची घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:12 IST

Kanda Crop Management : सद्यस्थितीत ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर (Crop Management) परिणाम होण्याची शक्यता आहे.

Kanda Crop Management : नाशिक जिल्हातील काही भागात अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली असून, सोबत धुक्याच प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कांदा पिकावर व रोपवाटीकेमध्ये मर व करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, हे विचारात घेऊन शेतकरी बांधवांनी खालील उपाययोजना कराव्यात.

कांदा रोपवाटिका -

  • रोपवाटीकेमध्ये ढगाळ व पावसाळी वातावरणामध्ये रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, पिथीयम आणि फ्युझारीयम येण्याची शक्यता आहे. 
  • रोपवाटीकेमध्ये पावसाचे पाणी साचलेले असल्यास जमिनीमध्ये हवा (ऑक्सिजन) खेळती राहत नाही परिणामी मुळ्यांना अन्नद्रव्य घेणे कठीण होते. 
  • त्यामुळे पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा. 
  • ढगाळ व पावसाळी वातावरणात रोपवाटीकेमध्ये मर येऊ नये, यासाठी प्रत्येकी १ किलो जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा विरीडी व स्युडोमोनास फ्लुरोसंस १ एकर रोप वाटीकेसाठी १०० किलो कुजलेले शेणखतामध्ये मिसळून वाफ्यामध्ये टाकावे.
  • मर रोगाचा प्रादुर्भाव दिसलाच तर कॅप्टन ३ ग्रॅम / लिटर किंवा मेटालॅक्झील ४ टक्के अधिक मॅन्कोझेब ६४ टक्के संयुक्त बुरशीनाशक २ ग्रॅम/लिटर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम/लिटर या पैकी कोणतेही एक बुरशीनाशक घेऊन १ लिटर एका वाफ्यामध्ये ओतावे.
  • रोपवाटीकेमध्ये करपा रोगाच्या नियंत्रणासाठी एम-४५  ०.५ ग्रॅम / लिटर किंवा कार्बनडॅन्झीम १ ग्रॅम / लिटर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड १ ग्रॅम लिटर या प्रमाणे कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • पानावर धुके किंवा दव पडत असल्यास अशा वेळेस स्टीकरचा वापर करावा, जेणेकरून दव पानावर थांबणार नाही, रोगाचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. 

 

कांदा

कांदा पिकामध्ये ढगाळ वातावरणामुळे काळा करपा किंवा तपकिरी करपा येण्याची शक्यता आहे.  नियंत्रणासाठी पुढील फवारण्या कराव्या.

  • सुरवातीच्या कालावधीमध्ये प्रतिबंधात्मक म्हणून कार्बनडॅन्झीम १ ग्रॅम / लिटर किंवा डायथेन एम- ४५ २.५ ग्रॅम / लिटर किंवा क्लोरोथेलोनील(कवच) २ ग्रॅम / लिटर किंवा प्रोपिनेब (अंट्रॉकॉल) २ ग्रॅम / लिटर किंवा डायथेन झेड-७८२ ग्रॅम / लिटर या प्रमाणे आलटून पालटून फवारण्या कराव्या. 
  • रोगाची तीव्रता जास्त आढळल्यास डायफेनकोनॅझोल (स्कोर) १ मिली/लिटर किंवा अझोस्ट्रोबीन डायफेनकोनॅझोल (अॅमीस्टार टॉप) १ मिली लिटर टेबुकोनॅझोल (फोलीक्युअर) १ मिली / लिटर या प्रमाणे कोणत्याही एका बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.

 

- विशाल चौधरी, विषय विशेषज्ञ-पिकसंरक्षण कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव - पवन चौधरी, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव 

टॅग्स :कांदापीक व्यवस्थापनशेती क्षेत्रमार्केट यार्ड