Kakdi Crop : अल्प कालावधीत उत्पन्न देणारे आणि कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणारे पीक म्हणून काकडीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे, असे मत कृषी विभागाने व्यक्त केले आहे. (Kakdi Crop)
विशेषतः जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पेरणी केल्यास अवघ्या दीड महिन्यात उत्पादन सुरू होते, तसेच बाजारात दरही समाधानकारक मिळतात.(Kakdi Crop)
काकडी हे वेलवर्गीय पीक असून उन्हाळी हंगामात त्याची मागणी वाढते. त्यामुळे अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी हे पीक उत्पन्नाचे जलद साधन ठरू शकते.(Kakdi Crop)
काकडीचे सुधारित वाण
काकडी पिकात पूना खिरा हा वाण लागवडीनंतर सुमारे दीड महिन्यात फळतोडीस येतो.
हिमांगी हा वाण पूना खिराच्या तुलनेत अधिक उत्पादन देणारा असून फळांना बाजारात चांगला भाव मिळतो.
तर फुले शुभांगी हा वाण केवडा रोगास प्रतिकारक असून अधिक उत्पन्न देणारा असल्याने शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
बियाणे, बीजप्रक्रिया व लागवड
काकडी पिकासाठी २ ते २.५ किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते. चांगले उगवण आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
बिया २४ ते ४८ तास ओल्या फडक्यात किंवा पोत्यात बांधून ठेवाव्यात. त्यानंतर बाविस्टिन २० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात बीजप्रक्रिया करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
दोन वेलींमधील अंतर ४५ ते ६० सेंमी ठेवावे, जेणेकरून वेलांची वाढ चांगली होईल.
जमिनीची तयारी व खत व्यवस्थापन
काकडी लागवडीपूर्वी जमिनीचे माती परीक्षण करणे आवश्यक आहे. अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अतिरेक झाल्यास उत्पादनात घट होऊ शकते.
काकडी पिकासाठी हेक्टरी २५ टन शेणखत, ११० किलो युरिया (लागवडीवेळी), ३०० किलो सुपर फॉस्फेट, ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मादी फुलांचे प्रमाण वाढवण्यासाठी उपाय
काकडी उत्पादन वाढीसाठी मादी फुलांचे प्रमाण वाढणे आवश्यक असते. त्यासाठी पीक दोन व चार पानांच्या अवस्थेत असताना जिब्रेलिक अॅसिड १० ते २५ पीपीएम, किंवा बोरॉन ३ पीपीएम यापैकी एका घटकाची फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे
काकडी पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी देण्यात अनियमितता झाल्यास फुलांची गळ होण्याची शक्यता असते.
फळांची वाढ होत असताना पाण्याचा ताण पडून नंतर अचानक जास्त पाणी दिल्यास फळांना तडे जातात आणि काही वेळा अपक्व फळे गळून पडतात, असा इशारा कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
फळकूज / फळसड रोगाचा धोका
काकडीसह भोपळा, कारली, घोसाळी, पडवळ आणि इतर वेलवर्गीय पिकांवर फळकूज किंवा फळसड रोग आढळतो.
हा रोग पिथिअम, फायटोप्थोरा, फ्युजारिअम, रायझोक्टोनिया आणि स्क्लेरोशियम या बुरशीमुळे होतो. त्यामुळे वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक
थोडक्यात, कमी खर्च, अल्प कालावधी आणि चांगला बाजारभाव या तीनही बाबी लक्षात घेता काकडी हे पीक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
योग्य वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन केल्यास काकडी पिकातून चांगले उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
