Join us

उन्हाळी हंगामात पिकांची नेमकी कशी आणि काय काळजी घ्यावी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 13:33 IST

उन्हाळी हंगामातील जास्तीच्या तापमानामुळे पिकांची जपणूक करणे आवश्यक झाले आहे.

उन्हाळी हंगामातील जास्तीच्या तापमानामुळे किंवा पाण्याचा इतरत्र वापर केला गेल्यामुळे पिकांसाठी पाण्याची उपलब्धता कमी होते. अशा परिस्थितीत उन्हाळी पिकांची जपणूक करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी कशी आणि काय काळजी घ्यावी याबाबत सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांनी शेतकऱ्यांना अवगत केले आहे. 

आच्छादनाचा वापर करणे : उन्हाळी हंगामात जास्तीच्या तापमानामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरुन बाष्पीभवन होवून वाया जाणारे पाणी आच्छादनाचा वापर करुन थोपवता येते. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे आच्छादन हेक्टरी ५ टन या प्रमाणात पीक ३ ते ४ आठवड्यांचे असताना शेतात टाकावे.

⁠एकाआड एक सरी भिजविणे : पाण्याची उपलब्धता अत्यल्प असल्यास उन्हाळी पिकांची एकाआड एक सरी भिजवावी. दुस-या पाण्याच्या वेळी पहिल्यांदा जी सरी भिजविली नसेल ती भिजवावी. असे केल्याने पाण्यात ३० ते ४० टक्के बचत होते तसेच पाणी टंचाईच्या काळात पिकही जगवता येते. 

पानांची संख्या कमी करणे : उन्हाळी हंगामात वातावरण उष्ण असते. तापमान नियंत्रित करण्यासाठी पानांद्वारे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. मात्र बहुतेक ठिकाणी उन्हाळी हंगामात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे पिकास पाण्याची उपलब्धता कमी असते. अशा वेळी पिकाच्या शेंडयाकडील नवीन पाने ठेवून खालच्या बाजूची जूनी पाने काढून टाकावीत. 

केओलिनचा फवारा करणे : पानाद्वारे होणारे बाष्पनिष्कासन कमी करण्यासाठी केओलिन (चुन्याची भुकटी) चे द्रावण ८% (१० लिटर पाण्यात ८०० ग्रॅम) या प्रमाणात पानांवर फवारावे.

पिकाभोवती आडोसा करणे : उन्हाळयातील उष्ण वा-यामुळे पीक कोमेजून जाते पर्यायाने उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी पिकाच्याकडेने वारा वाहतो त्या दिशेने शेवरी, धैंचा यासारखी पिके २ ते ३ ओळीत लावल्याने पिकास चांगला आडोसा तयार होतो. अर्थातचं याचे नियोजन हंगाम सुरु होण्यापूर्वीच करणे गरजेचे असते.

पिकास सांयकाळी पाणी द्यावे : उन्हाळी हंगामात पिकास सकाळी किंवा दुपारी पाणी दिले तर वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होवून जास्त पाणी लागते. त्याकरीता शक्यतो पिकास सांयकाळी पाणी दयावें.

पाटांची निगराणी करणे : चारीतून वाहणा-या पाण्यात तणांमुळे अडथळा निर्माण होतो तसेच चारीत पडलेल्या भेगा व उंदरांच्या बिळामुळेही पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्याकरीता ठराविक कालावधीनंतर चारीची स्वच्छता करावी तसेच भेगा/बिळे बुजवावेत.

 पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीशेतकरीसमर स्पेशलपीक व्यवस्थापन