गोंदिया : हरभरा पिकाची पेरणी जवळजवळ सर्वत्र आटोपली असून हे पीक सध्या रोपावस्थेत असून सध्या या पिकावर कट वर्म म्हणजेच शेंडे, पाने व रोपे कुरतडणाऱ्या अळीच्या किडीचा प्रादुर्भाव संभवतो. त्यामुळे किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनी दिली आहे.
किडींची ओळख
- ही एक बहुभक्षीय कीड असून या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने उशिरा पेरणी केलेल्या पिकावर होतो.
- मादी पतंग सुरूवातीस पीक व तणाच्या पानांवर तसेच कोवळ्या शेंड्यावर एक-एक करुन किंवा समूहाने ३०० ते ४५० अंडी घालते.
- अळीची लांबी ही ०.२ ते १.५ इंच असते.
- या अळीचा रंग हा भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो.
- या अळीच्या पाटीवर करड्या रंगाचा पट्टा शरीराच्या दोन्ही बाजूने असतो.
- शेतामध्ये पाने शेंडे कुरतडलेल्या अवस्थेत दिसून येतात.
- मात्र अळी ही झाडाच्या बुंद्याला मातीमध्ये लपून बसते व मुख्यत्वे रात्री पिकावर येऊन पाने व शेंडे कुरतडते.
- प्रादुर्भाव जास्त असल्यास दिवसा देखील ही अळी पिकावर आढळून येते.
- पूर्ण वाढ झालेली अळी १.५ ते २ इंच लांब असते. अळीला स्पर्श केल्यास तो शरीराचा 'सी' आकार करताना दिसून येते.
- पिकाच्या सर्व अवस्थामध्ये या अळीचा प्रादुर्भाव होवू शकतो.
- ही कीड रोप अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास रोप कुरतडते व नंतरच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पाने व शेंडे कुरतडते.
- पूर्ण वाढ झालेली अळी ही जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.
असे करा व्यवस्थापन :
- शेत किंवा बांधावर कचऱ्याचे ढीग तसेच तण राहणार नाही असे नियोजन करावे.
- प्रतिहेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खाऊन फस्त करतात.
- या अळीचा प्रादुर्भाव लष्करी अळीप्रमाणे एकच वेळी आढळून येतो म्हणून शेतातील पिकांमध्ये मादी पतंगाने अंडी घालू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- प्रादुर्भाव २ अळ्या प्रतिमीटर ओळ अशी आर्थिक नुकसानीची पातळी आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस २० टक्के ईसी ५० मिली किंवा क्लोरट्रनिपोल १८.५० टक्के ३.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- आवश्यक भासल्यास १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. अशी उपाययोजना केल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होईल.
