Gerbera Farming : विविध विध सजावटीसाठी, कुंड्यामध्ये लावण्यासाठी, फुलदाणीत ठेवण्यासाठी, हिरवळीच्या मध्यावर किंवा कडेला लावण्यासाठी जरबेरा हे फुलझाड चांगले आहे. या फुलांचा उत्तम दर्जा, काढणीनंतर अधिक काळ टिकण्याची क्षमता, फुलांचे विविध आकर्षक रंग आणि आकार इत्यादी गुणधर्मांमुळे जरबेराच्या फुलांपासून हार आणि उत्कृष्ट प्रतीचे गुच्छ तयार करता येतात. या सर्व बाबींचा विचार केला असता देशांतर्गत विक्रीसाठी तसेच परदेशात फुलांची निर्यात करण्यासाठी या फुल पिकाखालील क्षेत्र वाढविण्यास बराच वाव आहे.
हवामान
महाराष्ट्रातील उष्ण व कोरड्या आणि समशीतोष्ण हवामानात हे पीक चांगल्या प्रकारे घेता येते. भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा व सर्वसाधारण ५०० ते ६१५ मिलीमीटर पाऊसमान या पिकाच्या वाढीसाठी योग्य असते. तर अति पाऊस, बराच मोठा काळ अती कडक थंडी व कडक उन्हाळा जरबेराच्या उत्पादनास मानवत नाही. दिवसाचे १२ ते २५ अंश सेल्सिअस तापमान, ५०-६० टक्के आर्द्रता आणि रात्रीचे १२ अंश सेल्सिअस तापमान असल्यास या फुलांचा दर्जा चांगला मिळतो.
जमीन
जरबेराच्या लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी हलकी, मध्यम काळी किंवा पोयट्याची जमीन अधिक योग्य असते. चोपण मातीच्या, चुनखडीयुक्त आणि पाण्याचा अयोग्य निचरा होणाऱ्या जमिनीत या पिकाची लागवड चांगली होत नाही. त्याचप्रमाणे भारी, काळ्या व अत्यंत सुपीक जमिनीत झाडाची केवळ पालेदार वाढ होते.
आणि फुलांचे समाधानकारक उत्पादन मिळत नाही. म्हणून अशा प्रकारच्या जमिनीत जरबेराची लागवड करू नये. साधारणपणे ३०-४५ सेंटीमीटर मध्यम खोलीची काळी व ५.० ते ७.५ दरम्यान सामू असलेली जमीन जरबेराच्या लागवडीसाठी सर्वात चांगली असते. हलक्या जमिनीतही पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खते घालून या पिकाची किफायतशीर लागवड करता येते.
सुधारित जाती
क्रीम क्लेमेंटाइन, मरोन क्लेमेंटाइन, फ्लेमिंगो, फ्रेडोरेलो, गोल्डन गेट, ऑरनेला, कोझ्याक, गोल्ड डिस्क, मेलो डिस्क, लेडी, टोरो, स्पिंक्स, सांग्रीया, बित्राफा, लव्हली डिस्क, पसादेना, पारिजात, पालरेमो, पनामा, पामेला, पोलर, झेब्रा, विजय ट्रोपिकल, स्पायडर.
अभिवृद्धी
जरबेराची अभिवृद्धी बियांपासून, शाखीय पद्धतीने ऊतीसंवर्धन पद्धतीनेही जरबेराची अभिवृद्धी करता येते.
लागवड
जरबेराची व्यापारी तत्वावर शेतात लागवड करताना जास्त पावसाचा काळ वगळता वर्षभर केव्हाही लागवड केली तरी चालते. लागवडीपूर्वी जमीन नांगरून आणि दोनदा वखरणी करून भुसभुशीत करून घ्यावी व २०-३० टन चांगले कुजलेले शेणखत घालून ते मातीत चांगले मिसळून घ्यावे. जून महिन्यामध्ये बियांची गादीवाफ्यावर पेरणी करावी. रोपे ४-६ पानांवर आल्यानंतर शेतात पुनर्लागवड करावी. लागवड करण्यापूर्वी ४५ ते ६० सेंटीमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात आणि सरीच्या एका बाजूने ३०-४० से.मी. अंतरावर एका ठिकाणी एक फुटवा (सकर्स) लावून लागवड करावी. लागवड करतांना रोपाचा मधला वाढणारा शेंडा मातीत गाडला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
खते आणि पाणी व्यवस्थापन
जरबेरा हे पीक सेंद्रिय खताच्या वापराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते. त्यामुळे फुलांची चांगली प्रत व काढणीनंतर चांगला टिकाऊपणा पाहिजे असल्यास पिकाला भरपूर प्रमाणात सेंद्रिय खत देणे आवश्यक आहे. या पिकाची व्यापारीदृष्ट्या लागवड करावयाची असल्यास लागवडीपूर्वी शेतात हेक्टरी २०- ३० टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. याशिवाय लागवडीच्या वेळी हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश खतांची मात्रा द्यावी.
५० किलो नत्राचा दुसरा आणि तिसरा हफ्ता लागवडीनंतर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात द्यावा. यामुळे झाडांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. जरबेरा या पिकाला योग्य वेळी, योग्य प्रमाणात परंतु नियमित पाणी देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. फुलांच्या बहाराच्या वेळी प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास फुलांची प्रत खराब होण्याची शक्यता असते. यासाठी जमीन व हवामान पाहून गरजेनुसार पावसाळ्यात १०-१२ दिवसांच्या अंतराने, हिवाळ्यात ८-९ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात ४-६ दिवसांच्या अंतराने पिकाला नियमित पाणी द्यावे. पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पिकांची एकसमान वाढ होऊन नियमित उत्पादन मिळते.
आंतरमशागत
जरबेराचे पीक जास्त काळ शेतात राहत असल्यामुळे लागवडीपूर्वी शेतातील हराळी, लव्हाळा, कुंदा यासारख्या बहुवर्षायू तणांचा नाश करावा आणि त्यानंतर पिकाची लागवड करावी. लागवडीनंतर तणे उगवून आल्यास वेळोवेळी खुरपण्या करून पीक तणमुक्त ठेवावे. याशिवाय झाडांना मातीचा भर देणे, झाडाच्या बुडाखालील रोगट तसेच सुकलेली पाने काढून टाकणे यासारखी मशागतीची कामे नियमित केल्यास झाडांची वाढ चांगली होऊन उत्तम प्रतीच्या फुलांचे उत्पादन मिळते.
फुलांची काढणी आणि उत्पादन
जरबेराची लागवड केल्यापासून दीड ते दोन महिन्यात फुले येण्यास सुरुवात होते. फुलांची काढणी करताना फुलाच्या बाह्य बाजूस असलेल्या फुलातील परागकण परिपक्व झालेले दिसल्यास, अशी फुले जमिनीलगत छाटून घ्यावीत. फुलांची काढणी केल्यानंतर त्वरित फुलांचे दांडे २-३ तास पाण्यात बुडवून ठेवावेत.
यानंतर फुलांचा रंग, दांड्याची लांबी किंवा आकार याप्रमाणे प्रतवारी करून एक ते दोन डझन फुलांच्या जुड्या रबरने बांधून, जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावे. जरबेराची एकदा लागवड केल्यावर २-३ वर्षे उत्पादन घेता येते. जरबेराचे दरवर्षी हेक्टरी ५-७ लाख फुलांचे उत्पादन मिळते. या पिकाच्या सुधारित जातींची लागवड केल्यास एका झाडापासून प्रति वर्षी ४०-५० फुले मिळतात. पुढील वर्षी उत्पन्न दीड ते दोन पटीने वाढते.
