गव्हाची साठवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर
Gahu Sathavnuk :गहू अधिक (Gahu Crop Management) काळ चांगल्या स्थितीत राहण्यासाठी गव्हाची व्यवस्थित साठवण करणे महत्त्वाचे असते. गहू साठवणुकीसाठी ओलावा, उंदीर, पक्षी आणि घाणीपासून मुक्त अशा सुरक्षित जागेची निवड करावी.
गहू साठवणुकीसाठी (Gahu Sathvanuk) धातूच्या पत्र्यापासून अथवा सिमेंटपासून बनविलेल्या सुधारित कोठयांचा वापर केल्याने कीड, उंदीर किंवा ओलाव्याचा प्रादुर्भाव होत नाही. तसेच आवश्यकता पडल्यास या कोठारामधील धान्याला विषारी वायूची धुरी देणे शक्य असते.
पोत्यात गव्हाची साठवणूक Wheat Store) करताना पोती स्वच्छ साफ करूनच त्यात धान्य भरावे. धान्य भरलेली पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या चादरीवर ठेवावीत. असे केल्याने गव्हाची जमिनीतील ओलाव्यामुळे जी नासाडी होते ती होत नाही. बाजारात पोत्याच्या आकाराच्या पॉलिथिनच्या पिशव्या मिळतात, अशा पिशव्या पोत्यात घालून नंतर त्यात धान्य भरले तर धान्य अधिक काळ सुरक्षित राहते.
अशी घ्या काळजी
- साठवलेल्या गव्हातील किडींच्या नियंत्रणासाठी २० मि.ली. मेलिथिऑन (५०% प्रवाही) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- दर १०० चौरस मीटर जागेसाठी ३ मि.ली. मिश्रण फवारणीसाठी वापरावे.
- तसेच ३० ग्रॅम प्रति क्विंटल या प्रमाणात सेल्फॉस भुकटीचा बंद कोठारात वापर करावा.
- साठवलेल्या गव्हाची उंदीर मोठ्या प्रमाणात नासधूस करतात, ते टाळण्यासाठी विषारी अमिषाचा प्रत्यक्षात वापर करण्यापूर्वी २ ते ३ दिवस भरडलेल्या धान्यात थोडेसे गोडेतेल मिसळून उंदरांना आकर्षित करावे.
- नंतर १ भाग झिंक फॉस्फाईड + ५० भाग भरडलेले धान्य + पुरेसे गोडेतेल असलेल्या अमिषाचा वापर करून उंदरांचा बंदोबस्त करावा.
- साठवलेल्या गव्हाचा पुढील हंगामात बियाणे म्हणून वापर करावयाचा असल्यास साठवणुकीदरम्यान प्रत्येक पोत्यात १ किलो वेखंड पावडर टाकावी.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त शास्रज्ञ, कृषी विद्यापीठ