Draksh Bag Agap Chatani : छाटणीपूर्वी पानगळ करून छाटणीवेळी डोळे फुगलेले असणे गरजेचे असते. यासाठी छाटणीच्या १५ दिवस अगोदर हाताने अथवा रसायनाने पानगळ करावी. बऱ्याच भागात पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन कमी-अधिक पानगळ झालेली दिसते. आपल्या बागेतील परिस्थितीचा विचार करता हाताने पानगळ किंवा फवारणीचा कालावधी मागेपुढे करता येईल.
उदा. ५०% पानगळ झालेल्या बागेत आठ दिवसांपूर्वी पानगळ केली तरी पुरेसे असेल. मजुरांची उपलब्धता असल्यास आपण छाटणी करणार असलेल्या डोळ्याच्या ठिकाणची आठ-दहा पाने हाताने काढून घेता येतील. रसायनाचा वापर करायचा झाल्यास इथेफॉन ३-५ मिली अधिक ०-५२-३४ ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारणी करावी.
फवारणीच्या दोन-तीन दिवसांनंतर पाने पिवळी पडायला सुरुवात होईल. त्यानंतर पान गळून खाली पडेल. दहा-अकरा दिवसांत बागेतील पूर्ण पानगळ झालेली दिसेल. काडीवरील डोळे फुगलेले दिसतील. डोळे तपासणीच्या अहवालानुसार बागेत छाटणी करून घ्यावी. डोळे तपासणी न केलेल्या बागेत छाटणी करताना आपला पूर्वानुभव ध्यानात घ्यावा.
सबकेन असलेल्या काडीवर गाठीच्या शेजारी एक-दोन डोळे राखून छाटणी घ्यावी. सरळ काडी असलेल्या परिस्थितीत सबकेनच्या शेजारी एक-दोन डोळे राखून छाटणी करावी. सरळ काडी असलेल्या परिस्थितीत आखूड पेरा असलेल्या ठिकाणी (सहा-आठवा डोळा) राखून छाटणी करावी.
काडीच्या जाडीनुसार बागेतील वातावरण, तापमान व डोळा किती फुगला आहे, यावर हायड्रोजन सायनामाइडची मात्रा अवलंबून राहील. साधारण परिस्थितीत ८-१० मिमी. जाड काडीवर डोळा फुगलेला असल्यास ३०-३५ अंश सेल्सिअस तापमानास ४० मिली हायड्रोजन सायनामाइड पुरेसे होईल. यावेळी बागेत बऱ्यापैकी रोगांचा प्रादुर्भाव असल्यामुळे याच द्रावणात ३-४ ग्रॅम मॅन्कोझेब प्रतिलिटर पाणी याप्रमाणे मिसळता येईल.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी