Dalimb Crop Management : नाशिक जिल्ह्यातील विविध फळपिकांपैकी डाळिंब या फळांवर फळांतील रस शोषणाऱ्या पतंगांचा प्रादुर्भाव होत असतो. यामुळे फळांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात हे समजून घेऊयात....
डाळिंबावरील रस शोषणारा पतंग
- हा एक निशाचर पतंग आहे, म्हणजे तो रात्रीच्या वेळी सक्रिय असतो.
 - या पतंगाची रचना विशिष्ट प्रकारची असते, ज्यामुळे तो आपल्या सोंडेने पिकलेल्या डाळिंबांच्या फळांना सूक्ष्म छिद्रे पाडून आतील रस शोषतो.
 - हा पतंग आकर्षक असून त्याच्या मोठ्या आकारावरून आणि रंगावरून ओळखता येतो.
 - पिकलेली फळे निवडून त्यावर पतंग बसतात आणि फळांचे नुकसान करतात.
 
अशा करा उपाययोजना
- बागेत व बागेच्या आजूबाजूला गुळवेल, वासनवेल, घाणेरी, एरंडी या यजमान वनस्पति असतील तर काढून टाकाव्यात.
 - बागेतील गळून पडलेली व कुजणारी फळे गोळा करून गाडून टाकावीत.
 - फळांतील रस शोषणाऱ्या पतंगांनी छिद्र पाडलेली फळे काढून टाकू नयेत. कारण पतंग पुन्हा त्याच फळावर बसेल व दुसरे फळ खराब करणार नाही. मात्र अशा फळांची कूज टाळण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी.
 - मर्यादित क्षेत्रावर सूर्यास्तानंतर टॉर्च व हातातील नेटच्या साह्याने फळांतील रस शोषणारे पतंग पकडून मारून टाकावेत.
 - बागेच्या प्रत्येक कोपऱ्यावर १५०-२०० वॅट फ्लुरोसंट दिवे एकमेकांकडे तोंड करून उभारावेत.
 
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
