Dalimb Farming : मृग बहरातील डाळिंब बागांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी योग्य नियोजनाचा अभाव असल्यास शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड बसू शकतो. डाळिंब बागेत वेळच्या वेळी पाहणी करून रोगांचे व्यवस्थापन फायदेशीर ठरते.
मृग बहर (रोग व्यवस्थापन)
- पानगळीनंतर लगेच ताज्या तयार केलेल्या १ टक्का बोर्डो मिश्रणाची एक फवारणी करावी.
- सॅलिसिलिक ॲसिड ०.३ ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फुलधारणेपूर्वीपासून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येकी चार फवारण्या कराव्या.
- बोर्डो मिश्रण ०.५ टक्का किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ डीएफ) १.५-२ ग्रॅम अधिक स्टीकर स्प्रेडर ०.५ मि.ली. प्रति लिटर पाणी : या व्यतिरिक्त २-ब्रोमो, २-नायट्रोप्रोपेन-१, ३ डायोल (ब्रोनोपॉल ९५.८ डीएफ) ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १० दिवसांच्या अंतराने फवारावे.
- जर बागेत आधीपासूनच तेलकट डागाचा प्रादुर्भाव असेल, तर कासुगामायसिन २ मि.ली. प्रति लिटर पाणी हे महिन्यातून एकदा आणि ७-१० दिवसांच्या अंतराने ब्रोनोपॉल फवारावे.
- गरजेपेक्षा अधिक फवारण्या टाळाव्यात. जर पाऊस झाला असेल, तर लगेचच कासुगामायसिन + कॉपरजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- बागेमधील बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावानुसार कॉपरजन्य बुरशीनाशके बदलून योग्य बुरशीनाशके वापरावीत.
- (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी