Amba Khodkid : आंब्याची खोडकीड ही आंब्याच्या झाडासाठी अत्यंत हानिकारक कीड आहे. याला भिरुड कीड असेही म्हणतात. या किडीच्या अळ्या खोडात शिरून आतला भाग पोखरतात, ज्यामुळे झाड कमकुवत होते आणि फांद्या वाळून जातात. आजच्या भागातून खोडकिडीच्या नियंत्रणासाठी काय उपाय करावेत, हे पाहुयात...
खोडकीड (भिरुड)
- खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे.
- खोडातून भुसा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावेत.
- खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्यास पाने पिवळी पडतात.
- खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो.
- पटाशीच्या साह्याने खोडाची प्रादुर्भावीत साल काढून अळीला बाहेर काढून मारून टाकावे.
- इंजेक्शनच्या मदतीने क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात बनवून छिद्रात टाकावे.
- कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्र बंद करावे.
- नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांच्या जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी.
- कलमांचे बुंधे आणि आळी तण विरहित व स्वच्छ ठेवावीत.
- वाऱ्याचा वेग वाढल्यास कलमे कोलमडून पडू नयेत, म्हणून मातीची भर द्यावी.
- नवीन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार द्यावा.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी