Amba Bag Chatani : जुन्या आंबा बागेच्या पुनरुज्जीवनासाठी झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करणे, जुनी व रोगट झाडे काढून टाकणे, बागेत स्वच्छता ठेवणे, गांडूळ खत व इतर सेंद्रिय खतांचा वापर करणे, आंतरपीक घेणे आणि गरज असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, यांसारख्या उपायांचा समावेश होतो.
यामुळे झाडांची वाढ जोमदार होते, उत्पादकता वाढते, फळांची गुणवत्ता सुधारते आणि कमी खर्चात चांगले उत्पादन घेणे शक्य होते. या काळात आणखी काय काय गोष्टी कराव्यात, हे समजून घेऊयात...
जुन्या आंबा बागेचे पुनरुज्जीवन
छाटणीची पद्धत
- पुनरुज्जीवन करावयाच्या झाडांची पुनरुज्जीवनानंतरची उंची ३.५ ते ४ मीटर (१० ते १२ फूट) असावी.
- झाडांची छाटणी फांद्यांच्या विस्तारावर अवलंबून असते. मुख्य खोडापासून तिसऱ्या फांदीवर झाडाची छाटणी करावी.
- मुख्य खोड किंवा दुय्यम फांद्यांवर छाटर्णी केल्यास झाड मरण्याची शक्यता असते.
- अशा छाटणीमुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यतादेखील बळावते.
- अतिउंच झाडांची छाटणी व पुनरुज्जीवन दोन-तीन टप्प्यात करावे.
- झाडांचे पुनरुज्जीवन करताना झाडांची मध्यफांदी पूर्णपणे काढावी.
- म्हणजे विस्तार पुन्हा वाढल्यानंतरदेखील झाडाचा मध्यभाग पूर्णपणे मोकळा राहून सूर्यप्रकाश झाडाच्या आतील भागापर्यंत पोहोचतो.
- त्यामुळे पालवी व फांद्या सशक्त होतात. रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
- पुनरुज्जीवनासाठी निवडलेल्या झाडांची योग्य उंचीवर चेन सॉ किंवा पोल पुनरच्या सहाय्याने छाटणी करावी.
- त्यामुळे काप एकसारखा व फांदीत जास्त इजा न होता घेता येतो.
- यांत्रिक करवती उपलब्ध नसतील तर पारंपरिक कोयता व कुन्हाडीसारखे पारंपरिक हत्यार वापरूनदेखील छाटणी करता येते.
- फांदी पिचणार नाही याची दक्षता घ्यावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी