मंडळी राम राम पेरणी कराया सुरुवात करायची. मग चला मिनाताई आणि अरुण भाऊ कडून आपणबी जाणून घेऊया. "बेसल डोस म्हणजे काय?" आणि त्यो कसा द्यायचा 
आज सकाळची वेळेला...  मिनाताई आणि अरुणभाऊ आपल्या शेतात मक्याची पेरणी करतायत. बाजूला खताच्या पोत्यातून. दोघं खत मिसळून माती तयार करत आहेत. एवढ्यात शेजारी तुकारामराव त्यांच्या शेताकडे येतात. 
तुकारामराव (थोडासा गोंधळून) : नमस्कार मिनाताई, अरुणभाऊ! काय चाललंय बघू शेतात?
मिनाताई (हसत) : नमस्कार हो तुकारामराव! काही नाही, मका टाकतोय. त्याचं खतं टाकतोय सोबत – बेसल डोस म्हणतात त्याला.
तुकारामराव (कुतूहलाने) : अगं, हे "बेसल डोस" म्हणजे काय बुवा? आणि कोणत्याही पिकाला किती द्यायचं ते कसं कळतं?
अरुणभाऊ: वा वा! भारी प्रश्न विचारलात तुम्ही! बेसल डोस म्हणजे, जे खत आपण पेरणीच्या वेळेसच मातीमध्ये टाकतो. म्हणजे पिकाच्या सुरवातीच्या वाढीसाठी लागणारं खत. 
तुकारामराव : म्हणजे एकदाच खत टाकलं की झालं?
मिनाताई : नाय रे! खत कोणतं, किती आणि कधी टाकायचं – हे समजून करावं लागतं. तसं नाही की "खत टाकलं, काम झालं". 
तुकारामराव : बरं, जर मका घेतला तर मक्याला काय काय टाकायचं?
अरुणभाऊ (माहिती देत) : हे बघा, मक्याला हेक्टरी बेसल डोस असा असतो - 
युरिया (नायट्रोजन) – ८८ किलो
सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) – ३७८ किलो
म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) – ६८ किलो
मका साठी खताचा डोस
नत्र- १२०
स्फुरद-६०
पालाश- ४० अस असतं मग बेसल डोस देताना नत्र तिन भाग करून त्यातला एक भाग द्यायचा आणि सगळ स्फुरद आणि पालाश द्यायचं. उरलेलं दोन भाग नत्र एक महिन्यानंतर समान अंतराने द्यायचं. हे खत मोकळ्या मातीत मिसळूनच पेरणीच्या वेळीच टाकायचं. आणि माती परीक्षणाचा रिपोर्ट असेल तर त्यानुसार थोडा फरक करायचा. 
तुकारामराव : हा म्हणजे पिकानुसार बदल होतो का?
मिनाताई : मगं हो की! प्रत्येक पिकाची गरज वेगळीच असते. आता कांद्याचं बघा ना!
तुकारामराव (उत्साहाने) : हो हो, कांद्याचं सांगा बरं!
अरुणभाऊ : कांद्याच्या लागवडीसाठी हेक्टरी :
नत्र- १०० किलो
स्फुरद- ५० किलो
पालाश- ५० किलो असतं मग त्यासाठी
🧅 युरिया – १०९ किलो
🧅 SSP – ३१३ किलो
🧅 MOP – ८३ किलो हे लागवड करतेवेळीच द्यायचं आणि राहिलेला १०९ किलो महिन्यानंतर दोनदा विभागून द्यायचा. 
यामुळे कांद्याच्या मुळांना चांगली ताकद येते आणि गड्डाही टपोरा बनतो. 
तुकारामराव :  व्वा! म्हणजे खत योग्य दिलं तर पीक भारीच येणार!
मिनाताई :  हो बघा! आणि खत पेरणीच्या अगोदरच किंवा त्याच वेळी टाकायचं, उशीर केला की फायदा नाही. 
अरुणभाऊ : आणखी एक महत्वाचं – खत बियाण्यांच्या अगदी जवळ टाकू नका. नाहीतर बी जळतं आणि उगमच होत नाही. 
तुकारामराव : 
म्हणजे काय समजलं –
योग्य प्रमाण
योग्य वेळ
योग्य प्रकार
हा तीन गोष्टींचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा!
मिनाताई (हसत) : बरोबरच! आणि सेंद्रिय खतं, गांडूळ खत, जीवामृत वगैरे वापरलं तर माती जास्त उपजाऊ होते. 
तुकारामराव : वा, छान माहिती दिलीत. आता मी पण बेसल डोस देताना काळजी घेईन. 
अरुणभाऊ : एकदा सुरुवात चांगली केली, वेळेवर पाणी दिलं, कीडनियंत्रण केलं की उत्पादन भारीच येतं. 
मिनाताई : शेती म्हणजे ज्ञान, नियोजन आणि काळजी – हेच तीन मंत्र लक्षात ठेवा. 
तुकारामराव (हसून) : खरंय! अशा गप्पांमध्ये पण खूप काही शिकायला मिळतं हो!
मिनाताई : म्हणूनच सांगते – असं गप्पा-गोष्टीतून आणि अनुभवातून शिकायचं असेल तर कृषि विभागाच्या ‘शेतीशाळा’ ला या. आम्ही पण तिथंच सगळं शिकलो. 
- श्रीमती सोनाली कदम
सहाय्यक कृषि अधिकारी, तालुका – येवला, जिल्हा – नाशिक
