Agriculture News : शेतात मागील सात वर्षांपासून ना नांगरट ना खुरपणी ना तण काढणी, तरीही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव येथील दीपक जोशी यांच्या शेतातील तूर बहरली आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांची पीके पाण्याखाली गेली, जमीन वाहून गेली पण जोशी यांच्या शेतात साधे पाणीही साचले नाही. हे सर्व विना नांगरणी शेती तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्याचं ते सांगतात.
मराठवाड्यात विना नांगरणी शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणारे दीपक जोशी यांची देवगाव येथे वडिलोपार्जित शेती आहे. त्यातील काही शेती ते नांगरट व जमिनीची कोणतीही हालचाल न करता करतात. यामुळे खर्च वाचतो आणि शेतीच्या उत्पन्नात वाढ होते असा त्यांचा अनुभव आहे. तर मातीची सुपिकता आणि सच्छिद्रता वाढते ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. यासोबतच पिकांसाठी लागणारे रासायनिक खते कमी प्रमाणात लागतात आणि भरघोस पीक येते असं दीपक जोशी सांगतात.
जोशी यांनी ३३ वर्षे ज्या जमिनीत पाणी साचत होतं त्या जमिनीचा मागच्या ७ वर्षात कायापालट करत तुरीचं पीक त्यांनी उगवून दाखवलं. पाणी साचत असलेल्या जमिनीत वारंवार पिकांच्या मुळांचे अवशेष कुजवल्यामुळे पाणी मुरत गेले अन् त्यामध्ये पिके घेत गेल्यामुळे माती पिकायोग्य झाली.
या जमिनीत ते वारंवार तूर पिकाची लागवड करतात आणि यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळते. सात वर्षांपासून करत असलेल्या विना नांगरणीमुळे शेतीमुळे मातीचा सेंद्रीय कर्ब वाढला अन् मुळांच्या अवशेषामुळे माती सुपीक बनली. ज्यामुळे मला या तूर पिकासाठी कोणत्याही रासायनिक खताची आवश्यकता भासली नाही असं जोशी सांगतात.
काय आहे विना नांगरणी तंत्रज्ञान?
१) शेतात नांगरणी, खुरपणी, वखरणी, कोळपणी करायची नाही.
२) पिकांची लागवड किंवा पेरणी केल्यानंतर केवळ पिकाच्या खोडाजवळील तण काढणे. इतर तणावर ग्रास कटर मारणे (तण उपटून काढायचे नाही) किंवा शिफारस केलेले तणनाशक मारणे.
३) पीक काढणीनंतर त्याला जमिनीपासून कट करणे. मूळे काढायचे नाही.
४) त्याच जमिनीत दुसऱ्या हंगामात पीक घेणे (तोपर्यंत मागील पिकांचे अवशेष कुजून जातात)
काय आहेत फायदे?
१) मजुरांची अडचण असताना मजुरीवरील खर्च वाचतो.
२) नांगरणी, खुरपणी, वखरणी यांचा अतिरिक्त खर्च वाचतो.
३) तण आणि पिकांच्या मुळांचे अवशेष जमिनीत कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढतो. जमीन सच्छिद्र होते आणि पावसाचे साचणारे पाणी जमिनीत मुरते.
४) शेतात तण वाढवल्यामुळे पिकांचे सहजीवन प्रस्थापित होते. मित्र किडी - शत्रू किडींचे योग्य व्यवस्थापन होते आणि पिकांवर रोग, अळी, किडींचा कमी प्रादुर्भाव होतो.
५) नांगरणी, खुरपणी, तण निर्मूलन या गोष्टींचा खर्च वाचतो व तो शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये रूपांतरित होतो.
६) माती सुपीक बनते व रासायनिक खतांची गरज कमी होते.
मी मागील ७ वर्षांपासून विना नांगरणी पद्धतीने शेती करतोय. यामध्ये माझा एकरी किमान १० हजार रूपये खर्च वाचतो. हा खर्च मी नफा म्हणून ग्राह्य धरतो. आत्तापर्यंत मला या पद्धतीचे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. प्रत्येकाने थोड्या तरी क्षेत्रावर हा प्रयोग करावा. शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
- दीपक जोशी (प्रयोगशील शेतकरी, देवगाव, ता. पैठण)
