lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?

आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?

How to protect mango fruit blossom? | आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?

आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?

आंबा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळपीक आहे. मात्र बऱ्याच वेळा आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात. आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे आंबा मोहोराचे कीड व रोगापासून होणारे नुकसान.

आंबा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळपीक आहे. मात्र बऱ्याच वेळा आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात. आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे आंबा मोहोराचे कीड व रोगापासून होणारे नुकसान.

शेअर :

Join us
Join usNext

आंबा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळपीक आहे. मात्र बऱ्याच वेळा आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात. आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे आंबा मोहोराचे कीड व रोगापासून होणारे नुकसान. शेतकरी बंधूनी कीड व रोगांचे वेळीच व्यवस्थापन केल्यास आंबा पिकाचे उत्पादन निश्चितच वाढू शकेल.

तुडतुडे
तुडतुडे ही आंबा पिकाची पालवी तसेच मोहोराचे नुकसान करणारी प्रमुख कीड समजली जाते. तुडतुड्यांचा समावेश रस शोषणाऱ्या किडींमध्ये होतो.
• पूर्ण वाढलेले तुडतुडे करड्या रंगाचे, गव्हाच्या दाण्याएवढे, पाचराच्या आकाराचे असतात.
• तुडतुडे पावसाळ्यानंतर येणाऱ्या पालवीवर पानांच्या मध्य शिरेत अंडी घालतात. अंड्यातून बाहेर येणारी पिल्ले काळसर राखाडी रंगाची असतात.
• पिल्ले व पूर्ण वाढलेले तुडतुडे पालवीतून रस शोषतात. परिणामी पालवी वेडीवाकडी वाढते व वाढ खुंटते.
• तुडतुड्यांचा खरा प्रादुर्भाव मोहोरावर आढळून येतो. पूर्ण वाढलेले तुडतुडे व त्यांची पिल्ले आंब्याच्या मोहोरामधून व कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर व छोटी फळे गळतात.
• त्याचप्रमाणे तुडतुडे मधासारखे चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात. हा चिकट पदार्थ झाडावर सर्वत्र पडतो व त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे संपूर्ण झाड काळसर दिसू लागते. फळे देखील काळी होतात. मात्र ही काळी बुरशी पृष्ठभागावरच पसरलेली असते. विशेषत: ढगाळ वातावरणामध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो व मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व उत्पादनात घट येते.

मिजमाशी
आंबा पिकाची पालवी व मोहोराचे नुकसान करणारी दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे मिजमाशी. ही एक माशी वर्गातील कीड आहे. माशी आकाराने सूक्ष्म, पांढरट पिवळसर रंगाची असते.
• मिजमाशी कोवळ्या पालवीच्या दांड्यामध्ये, पानांच्या देठामध्ये तसेच मोहोराच्या दांड्यामध्ये व लहान फळांवर असंख्य अंडी घालते. अंड्यातून बाहेर येणारी अळी सूक्ष्म, पिवळसर रंगाची असते. ती पालवीचे तसेच मोहोराचे नुकसान करते. त्यामुळे पालवी व मोहोर सुकून जातो.
• या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील कोवळ्या पालवीवर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नियंत्रणाच्या उपाययोजना न अवलंबल्यास झाडावर सुकलेले शेंडे दिसून येतात. बऱ्याचदा हा प्रादुर्भाव शेंडे पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावासारखा दिसतो.

फुलकीड
आंबा पिकाची पालवी तसेच मोहोराचे व फळांचे नुकसान करणारी ही एक महत्त्वाची कीड आहे. ही कीड आकाराने अतिशय सूक्ष्म असते. यातील काही जाती पिवळसर रंगाच्या तर काही काळसर रंगाच्या असतात.
• फुलकिडी कोवळ्या पालवीच, मोहोराच्या दांड्याची साल खरवडतात. तसेच कळ्या आणि फुलांच्या आतील भाग देखील खरवडतात. हल्ली नवीन आढळून आलेल्या जाती फळांची साल खरवडतात.
• प्रादुर्भावग्रस्त पानांच्या कडा वरच्या बाजूला वळतात, पानांच्या मुख्य व उपशिरा काळसर होतात. प्रादुर्भावाची तीव्रता वाढल्यास पानगळ होते. फळांवर प्रादुर्भाव झाल्यास फळांचा नैसर्गिक हिरवा रंग जाऊन फळांवर करड्या-तपकिरी रंगाचे चट्टे उठतात व फळे खराब दिसतात.

अधिक वाचा: एक एकर जमीन असणाऱ्यांनाही मिळणार रोजगार हमीतून विहिरीचा लाभ

आंबा मोहोराचे नुकसान करणारे महत्त्वाचे रोग
भुरी

भुरी हा बुरशीजन्य रोग आंबा मोहोराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. मोहोराच्या दांड्यावर भुरकट रंगाची बुरशी वाढते. तिलाच भुरी असे म्हणतात. भुरीमुळे मोहोराचे दांडे कमकुवत बनून मोहोर सुकून गळून जातो. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येते.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून शिफारस करण्यात आलेले आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रक

अ.क्रफवारणीचा कालावधीकीटकनाशक१० लीटर पाण्यासाठी प्रमाणशेरा
पहिली फवारणी पावसाळ्यानंतर येणारी कोवळी पालवीडेल्टामेथ्रीन २.८ टक्के९ मि.लीही फवारणी संपूर्ण झाडावर तसेच खोडावर घ्यावी. यामुळे पावसाळ्यात खोडावर लपलेल्या प्रौढ तुडतुड्यांचा देखील नाश होतो.
दुसरी फवारणी बोंगे फुटतानालॅम्बडा सायहेलोथ्रीन ५ टक्के६ मि.ली.ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम ५० टक्के १० ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथिल ५० टक्के १० ग्रॅम किंवा प्रोपिनेब ७० टक्के २० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून वापरावे
तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतरानेइमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के किंवा बुप्रोफेझिन २५ टक्के३ मि.ली.
२० मि.ली
तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ५ टक्के
चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतरानेथायोमेथॉक्झाम २५ टक्के२.० ग्रॅमहेक्झकोनॅझोल ५ मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम १२ टक्के+मॅन्कोझेब ६३ टक्के (तयार मिश्रण) १० ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून वापरावे.
पाचवी फवारणी चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतरानेडायमेथोएट ३० टक्के किंवा लॅम्बडा सायहेलोथ्रीन ५ टक्के१४ मि.लीयाप्रमाणे किटकनाशकाची फवारणी करावी.
सहावी फवारणी पाचव्या फवारणी नंतर गरज असल्यास १५ दिवसांच्या अंतराने  पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकांपैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी.

करपा
आंबा पिकाची पालवी, मोहोर आणि फळांचे नुकसान करणारा करपा हा एक महत्त्वाचा बुरशीजन्य रोग आहे. कोवळ्या पालवीवर गोलाकार तसेच अनियमित आकाराचे ठिपके पडतात. ठिपक्यांच्या भोवताली पिवळ्या रंगाचे वलय दिसून येते. ठिपकेग्रस्त पालवी जून झाल्यावर मधला भाग सडून गळून जातो व पानांवर आरपार छिद्रे दिसतात.
• मोहोर येण्याच्या कालावधीत अचानक पाऊस पडल्यास मोहोरावर या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. मोहोराच्या दांड्यावर काळसर तपकिरी ठिपके वाढतात व ते एकमेकांत मिसळतात. कळ्या, फुले व छोट्या फळांवर देखील तपकिरी काळसर ठिपके उठतात. पोषक वातावरणात संपूर्ण मोहोर करपून जातो.
• वरील सर्व महत्त्वाच्या कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वेळापत्रकाचा अवलंब करावा.

फांदीमर
सध्या काजू बागांमध्ये फांदीमर नावाचा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे हा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगाची लागण पावसाळ्यात होते. फांद्या टोकाकडून खाली मरत येतात. पाऊस संपता संपता झाडावर मेलेल्या फांदया दिसून येतात. फांदी जेथून पुढे मेलेली असते तेथे पांढऱ्या उभ्या रेषा दिसून येतात. तसेच साल देखील फाटलेली दिसते. काही वेळेस डिंक येतो.
नियंत्रण: पावसाची उघडीप पाहून मेलेल्या फांद्या छाटाव्यात. फांदी छाटताना फांदीच्या खालचा रोगाची लागण न झालेला भाग देखील छाटावा. छाटलेल्या फांद्या जाळून नष्ट कराव्यात व छाटलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. तसेच संपूर्ण झाडावर १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी घ्यावी. जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी एक टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.

आंबा पिकावरील कीड व रोगांच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी उपाययोजना
१) पावसाळा संपताच बागेची साफसफाई करावी. बागेतील सुकलेल्या व मेलेल्या फांद्या छाटून जाळून टाकाव्यात.
२) झाडांची वाढ दाट झाली असल्यास फांद्यांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचेल, अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी.
३) मे महिन्यात फळांची काढणी पूर्ण झाल्यावर रोगट फांद्या छाटून, बांडगूळ काढून टाकावे व त्यानंतर १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. याचा उपयोग फांदीमर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देखील होतो.
४) हंगामात पालवी व मोहोराची तपासणी करून कीड व रोगांची निरीक्षणे घेऊन योग्य त्या कीटकनाशकाची/बुरशीनाशकाची फवारणी करावी. कीड रोग ओळखण्यासाठी जवळच्या संशोधन केंद्राची मदत घ्यावी.
५) आंब्यावरील तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी लेकॅनीसिलीयम (व्हर्टीसिलीयम) लिकॅनी तसेच मेटॅरिझियम ॲनिसोप्ली या जैव नियंत्रणक्षम बुरशीच्या प्रजातींचा अंतर्भाव करावा. बागेत जास्त आर्द्रता असताना (ऑक्टोबर ते डिसेंबर) या बुरशींची फवारणी तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते (५ ग्रॅम/लीटर)
६) आंब्यावरील फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले रक्षक फळमाशी सापळे हेक्टरी ४ या प्रमाणात लावावेत.
७) आंब्यावरील फळमाशी व फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी बागेत गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

Web Title: How to protect mango fruit blossom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.