Join us

मसाल्याची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'काळीमिरी'ची लागवड कशी केली जाते? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:58 IST

Kalimiri Lagwad गरम मसाल्यातील 'काळीमिरी' हा महत्त्वपूर्ण घटक आहे. लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पादन सुरू होते.

गरम मसाल्यातील 'काळीमिरी' हा महत्त्वपूर्ण घटक आहे. लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पादन सुरू होते. आठव्या वर्षापासून भरपूर उत्पादन मिळते. एप्रिल जून महिन्यात मोहोर येऊन जानेवारी-मार्चमध्ये फळे तोडण्यास तयार होतात.

कशी कराल लागवड?◼️ सुपारीच्या बुंध्यापासून पूर्वेस ६० सेंटीमीटर अंतरावर तर नारळाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर उत्तरेस ३० बाय ३० बाय ३० सेंटीमीटर आकाराचे दोन खड्डे खणावेत.◼️ प्रत्येक खड्ड्यात दोन घमेली कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि अर्धा किलो सुपर फॉस्फेट वरच्या थरात मिसळावे.◼️ प्रत्येक खड्यात मुळे फुटलेले एक रोप लावावे.◼️ मुख्य पिकासाठी २.५ बाय २.५ मीटर ते ३.० बाय ३.० मीटर अंतरावर सिल्व्हर ओक किंवा भेंड रोपे मिरी लावण्याच्या एक वर्ष अगोदर लावून घ्यावेत.◼️ नंतर प्रत्येक खुंट झाडाजवळ ४५ सेंटीमीटर अंतर सोडून पूर्व आणि उत्तर दिशेस मुळ्या फुटलेली छाट कलमे लावावीत.◼️ सांडपाण्याचा उपयोग करून घराजवळील शोभेच्या झाडावर, फणसावर काळी मिरी वेलांची लागवड करता येते.

लागवडीनंतरची काळजी◼️ लागवडीनंतर मिरीचे वेल झाडावर व्यवस्थित चढण्यासाठी दोर सैल बांधून घ्यावा.◼️ वेलाची उंची सहामीटरपेक्षा वाढू देऊ नये.◼️ भेंड, सिल्व्हर ओक, पांगारा यांच्या खुंटावर काळ्या मिरीचे पीक घेतले असल्यास खुंटाची उंची आठ मीटरपेक्षा जास्त वाढू देऊ नये.◼️ एप्रिल-मेमध्ये फांद्याची छाटणी करून योग्य प्रकारची सावली द्यावी.◼️ वेलाला हिवाळ्यात ७ ते ८ तर उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन◼️ तीन वर्षापासून पुढे प्रत्येक वेलास २० किलो शेणखत/कंपोस्ट, ३०० ग्रॅम युरिया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.◼️ ही खते दोन समान हप्त्यात ऑगस्ट-सप्टेंबर व जानेवारी-फेब्रुवारीत द्यावीत.◼️ खत जमिनीच्या पृष्ठभागावर वेलीभोवती पसरून द्यावे. विळा अथवा खुरप्याच्या सहाय्याने जमिनीत मिसळावे.◼️ वेलीचे प्रखर उन्हापासून संरक्षण करावे.◼️ काळी मिरीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रति मिरी वेलावर जून, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात २५ टक्के आठ दिवस साठवलेल्या गोमूत्राची फवारणी व २५ टक्के द्रावणाची जमिनीत जिरवणी करावी.

पिक संरक्षण◼️ काळीमिरी वेलीचे पोलूभुंगा किडीपासून संरक्षण करण्यासाठी जुलै, ऑक्टोबर महिन्यात मॅलॅथिऑन या औषधांचा फवारा द्यावा.◼️ जलद व हळूवार मर व इतर रोगापासून संरक्षण करण्यासाठी पावसाळा सुरू होताच संपूर्ण वेलावर व त्यानंतर २० दिवसांच्या अंतराने दोन वेळा एक टक्का बोर्डो मिश्रण वेलीवर फवारावे.◼️ तसेच १० टक्के बोर्डोपेस्ट एक मीटर उंचीपर्यंत वेलीवर लावावी. रोगट पाने, मेलेल्या वेली मुळासह काढून जाळून टाकावीत.

कशी कराल काढणी?◼️ मिरीच्या घोसातील १ ते २ दाणे पिवळे किंवा तांबडे लाल होताच मिरीचे सर्व घोस काढावेत.◼️ घोसातील दाणे वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवावेत.◼️ उकळत्या पाण्यात बुडवलेली मिरी उन्हामध्ये ३ ते ४ दिवस चांगली वाळवावी.◼️ वाळल्यानंतर दाण्यांना सुरकुत्या पडतात व गडद काळा रंग येतो.◼️ हिरव्या मिरीच्या दाण्यावरील साल काढून पांढरी मिरी करता येते.

अधिक वाचा: रानभाज्यांमध्ये सर्वात महागडी आणि चविष्ट असणारी 'ही' भाजी बाजारात दाखल

टॅग्स :शेतीपीकशेतकरीलागवड, मशागतकोकणखते