ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी यांच्याकडे साधारणपणे दोन प्रकारचे फेरफार नोंदणीसाठी येतात. एक आहे नोंदणीकृत फेरफार व दुसरा अनोंदणीकृत फेरफार.
नोंदणीकृत फेरफारमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात जे दस्त होतात ते ऑनलाइन पध्दतीने नोंदणीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉग इनला ई फेरफार प्रणालीमध्ये फेरफार घेण्यासाठी प्राप्त होतात.
दुसरा प्रकार आहे अनोंदणीकृत फेरफार. यामध्ये अर्जदार स्वतः ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज व कागदपत्रे जमा करतात. जे अर्ज ऑनलाइन पध्दतीने प्राप्त होतात, त्यांचा फेरफार ग्राम महसूल अधिकारी तत्काळ तयार करून संबंधिताना नोटीस देतात.
याविषयी 'लोकमत'शी बोलताना तहसीलदार शशिकांत जाधव म्हणाले, फेरफार नोंदणीसाठी दिलेला अर्ज हा दुसऱ्या प्रकारात मोडतो.
जेव्हा अर्जदार वारस नोंदीचा अर्ज देतात, तेव्हा ग्राम महसूल अधिकारी हे प्रथम त्याची गाव नमुना ६ क वारस नोंदवहीला नोंद घेतात आणि तो मंजुरीसाठी मंडल अधिकारी यांना पाठवतात.
मंडल अधिकारी सर्व कागदपत्रांची तपासणी करुन ती वारस नोंद मंजूर/नामंजूर करण्याचा निर्णय घेतात. वारस नोंद मंजूर झाली असेल तर त्याचा फेरफार घेतला जातो आणि सर्व हितसंबंधिताना नोटिसा देऊन म्हणणे घेतले जाते. यासाठी १५ दिवसांचा कालावधी असतो.
हरकत आल्यास मंडल अधिकारी त्यावर निर्णय देतात. मंडल अधिकारी जेव्हा फेरफार मंजूर/नामंजूर करतात तेव्हा तत्काळ या फेरफारचा अंमल संबंधित ७-१२ आणि '८-अ'ला होतो आणि आपला ७-१२ अद्ययावत होतो.
आपण दाखल केलेला अर्ज वारस नोंदीचा असल्याने त्यात वारस नोंदवहीला नोंद घेणे आणि त्यानंतर फेरफार घेणे, असे दोन टप्पे असल्याने बऱ्याच वेळा विलंब होतो. काही तक्रार असल्यास संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार करता येते.
अधिक वाचा: 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजेनेचे काम कसे चालते? कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर