Join us

भुईमुगाची मुळं सडली अन् खोडावर पांढरी बुरशी आलीय; कशी रोखणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 16:13 IST

पेरणी करताना बियाणांची व जमिनीची निवड योग्य नसेल व बीजप्रक्रिया करण्याकडे काटेकोर लक्ष दिले नसेल तर हे पीक पांढरी बुरशी, मूळकुज, खोडकुज आदी बुरशीजन्य रोगांना बळी पडण्याची शक्यता आहे.

गरिबांचा बदाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुईमुगाची उन्हाळी हंगामातील पेरणी पूर्ण होत आली आहे. पेरणी करताना बियाणांची व जमिनीची निवड योग्य नसेल व बीजप्रक्रिया करण्याकडे काटेकोर लक्ष दिले नसेल तर हे पीक पांढरी बुरशी, मूळकुज, खोडकुज आदी बुरशीजन्य रोगांना बळी पडण्याची शक्यता आहे.

भुईमूग हे खरीप व उन्हाळी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात जवळपास दोन लाख हेक्टर तर उन्हाळी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाचे पीक घेतले जाते.

गहू काढल्यानंतर अथवा ऊस गेल्यानंतर उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीकडे शेतकरी वळतो. इतर पिकाच्या तुलनेत १०० ते १२५ दिवसात अधिकचे पैसे मिळवून देणाऱ्या भुईमुगाची लागवड करताना सुयोग्य व्यवस्थापन केले तर उत्तम आर्थिक फायदा होतो. त्यासाठी बियाणांची व जमिनीची निवड, बीजप्रक्रिया या महत्त्वाच्या बाबी आहेत.

पानं पिवळी, झाड सडते खोडकुज हा स्क्लेरोटियम रॉल्फ्सी या बुरशीमुळे होणारा रोग आहे. त्याच्या प्रादुर्भावामुळे जमिनीलगतच्या खोडावर पांढऱ्या रंगाचा बुरशीसारखा थर तयार होतो. मुळकुज या रोगाचा प्रादुर्भाव रायझोक्टोनिया सोलानी व फुसेरियम एसपीपी या बुरशीमुळे होतो.

मुळं कुजतायत, खोडं सडतायत!भुईमुगासाठी मध्यम भुसभुशीत निचरा होणारी, अधिकचा ओलावा न धरणारी, भरपूर सेंद्रीय पदार्थ असणारी जमीन लागते. हलक्या व निकृष्ट जमिनीवर पीक घेतले. जादा ओलावा धरणारी जमीन असली तर बुरशीजन्य रोगांना निमंत्रण मिळते. पांढरी बुरशी, मूळकुज, खोडकुज या रोगांनी भुईमूग पोखरला जातो. फायद्याचे गणित तोट्यात बदलते. बियाणांची निवड करताना कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या बियाणांची निवड करणे योग्य ठरते.

जैविक बुरशीनाशकाचा वापर कराया दोन्ही रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक उपाय योजावे लागतात. पिकांचा फेरपालट करावा लागतो. निरोगी बियाणांचा वापर, रोगमुक्त, प्रमाणित व प्रक्रिया केलेले बियाणे वापरणे फायदेशीर ठरते. शेणखत व जैविक खतांचा वापर करणे योग्य ठरते. पिकाच्या वाढीच्या वेळी जास्त ओलावा राहणार नाही याची काळजी घेणे. पाणी साचू नये, यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा ह्या जैविक बुरशीचा वापर करू शकता.

पेरणीआधी बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यकपेरणीपूर्वी बियाणास थायरम किंवा कार्बेन्डाझिम अथवा मॅन्कोझेब या बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी. प्रतिकिलो बियाणास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक चोळावे. त्यामुळे बियांमार्फत पसरणाऱ्या रोगांना आळा बसतो.

अधिक वाचा: Farmer id : शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा; नाहीतर यापुढे मिळणार नाही या गोष्टींचा लाभ

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणपीकशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनखरीपलागवड, मशागतपेरणी