गवताळ वाढ हा रोग उसामधील वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये महत्त्वाची लक्षणे दर्शवितो. रोगग्रस्त उसाची प्राथमिक लक्षणे लावणीनंतर अथवा खोडव्यातील उगवून आलेल्या उसाच्या पानांवर दिसून येतात.
को ४१९, को ७४०, को ७५२७, कोसी ६७१, को ९४०१२ व को ८६०३२ या जातीत या रोगाचे प्रमाण जास्त आढळते. महाराष्ट्रात या रोगाचे प्रमाण १०% पर्यंत आहे. या रोगाचा प्रसार बेण्यामार्फत व किडीद्वारे होतो.
रोगाची लक्षणे
◼️ रोगामुळे पिकाच्या सुरूवातीच्या काळात ऊस बेटात प्रमाणापेक्षा जास्त फुटवे दिसतात व बेटास गवताच्या ठोंबाचे स्वरूप येते.
◼️ बेटांत फुटल्यांची संख्या कधी-कधी १०० पेक्षा जास्त आढळते.
◼️ रोगामुळे उसाच्या पानामध्ये कमी प्रमाणात हरितद्रव्य तयार होते त्यामुळे पाने पिवळी किंवा पांढरी पडतात.
◼️ रोगट बेटात गाळण्यालायक ऊस तयार होत नाही.
◼️ रोगट उसावरील पाने अरुंद व आखूड होतात.
◼️ पूर्व वाढ झालेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, पोंग्यातील पाने पिवळी पडतात व कांड्यावरील डोळ्यातून पिवळसर पांगशा फुटतात.
◼️ रोगट ऊस नंतर पोकळ होऊन वाळतो.
◼️ गवताळ वाढ रोगामुळे ५ ते २० % पर्यंत ऊस उत्पादनात घट येते.
◼️ खोडवा पिकात ह्या रोगामुळे जास्त प्रमाणात बेटे पिवळी पडतात व मरतात.
◼️ रोगाचे प्रमाणदेखील सुरुवातीच्या काळात जास्त आढळते. रोगग्रस्त खोडवा पिकातील उसांची संख्या घटते.
रोग नियंत्रणाचे उपाय
◼️ बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी निवडावे.
◼️ बेणेमळ्यासाठी मुलभूत बेणे तयार करण्यासाठी लागवडीपूर्वी ऊस बेण्यास बाष्प-हवा प्रक्रिया यंत्राद्वारे ५४ सेंटिग्रेट तापमानास १५० मिनीटे प्रक्रिया करावी.
◼️ उसाची उगवण झाल्यानंतर नियमितपणे प्रादुर्भावग्रस्थ बेणे मुळासहीत काढावीत व जाळून नष्ट करावीत.
◼️ पिकाची पाहणी करून रोगट बेटे काढावीत.
◼️ सामुहिक पद्धतीने बेटे निर्मुलनाचा कार्यक्रम हाती घेतल्यास रोगाचे नियंत्रण प्रभावीपणे करता येईल.
◼️ बेणे छाटते वेळी कोयता अधून मधून उकळत्या पाण्यात निर्जंतुक करावा.
◼️ उसावरील रस शोषण करणाऱ्या किडींचा बंदोबस्त वेळीच करावा, जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही.
◼️ रोगाचे प्रमाण २०% पेक्षा जास्त असल्यास त्या पिकाचा खोडवा घेवू नये.
◼️ पिकाची फेरपालट करावी जेणेकरून रोगाचे प्रमाण पुढील पिकात कमी राहील.
अधिक वाचा: e Pik Pahani : पीक पाहणी झाली आता सोपी; मोबाईल अॅपमध्ये केले 'हे' बदल, वाचा सविस्तर