Join us

कपाशीची झाडे अचानक सुकू लागली आहेत मग आलाय 'हा' रोग; कसे कराल व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 10:38 IST

मराठवाडा विभागात मोठ्या खंडानंतर झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत.

मराठवाडा विभागात मोठ्या खंडानंतर झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.

कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात.

सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे तज्ञ डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत व श्री.एम.बी.मांडगे यांनी पुढीलप्रमाणे आकस्मिक मर व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला दिला आहे. 

आकस्मिक मर व्यवस्थापन

  1. शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
  2. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया अधिक १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत) अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली याप्रमाणे आळवणी करावी. किंवा एक किलो १३:००:४५ अधिक २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.
  3. वरीलप्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.
  4. वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.

- कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी02452-229000

अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावरील 'ह्या' नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय; आता एकही अर्ज पेंडीग राहणार नाही

टॅग्स :कापूसपीककीड व रोग नियंत्रणमराठवाडामराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपीक व्यवस्थापनपाऊसपरभणी