मुक्त चुना म्हणजे चुनखडी होय. फळबागेसाठी जमिनीचा हा महत्वाचा गुणधर्म मानला जातो. विशेषकरून संत्रावर्गीय व इतर फळझाडांच्या बागा जास्त मुक्त चुना असणाऱ्या जमिनीत फलदायी होत नाहीत.
सूक्ष्मअन्नद्रव्यांची उणीव अशा जमिनीतील फळझाडांना पडू शकते, सीमित प्रमाणात मुक्त चुना असणे हे निरोगी जमिनीचे लक्षण आहे.
चुनखडीयुक्त जमिनी तयार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीतील क्षारांचा निचरा होण्यासाठी लागणारा पाऊस अपुरा पडतो आणि मुक्त चुन्याचा निचरा जमिनीतून होत नाही तसेच तापमान वाढल्यानंतर खालच्या थरातील चुनाही पृष्ठभागावर येत असतो.
चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा कशी कराल?
- चुनखडीयुक्त जमिनीची खोलवर नांगरट करावी.
- हिरवळीची पिके (उदा. धैंचा, ताग) घेऊन ती फुलोऱ्यात येताच (४५ ते ५० व्या दिवशी) जमिनीत गाडवीत.
- शेणखत, कंपोस्ट यांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धतता वाढते रासायनिक किंवा सेंद्रिय खते जमिनीच्या पृष्ठभागावर फोकून किंवा पसरवून देऊ नयेत. ती मातीमध्ये व्यवस्थित मिसळावीत.
- स्फुरदयुक्त खते शेणखतातून दिल्यास उपलब्धता वाढून स्थिरता कमी होते स्फुरद विरघळविणाऱ्या जैविक खताची (पी. एस.बी) बीजप्रक्रिया केल्यास स्फुरदाची उपलब्धतता वाढते.
- रासायनिक खतांचा वापर करताना नत्र, अमोनियम सल्फेटद्वारे तर स्फुरद डायअमोनियम फॉस्फेटद्वारे आणि पालाश, सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे दिल्यास पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते आणि अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण कमी होते.
- चुनखडीयुक्त जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने मॅग्नेशियमची कमतरता काही पिकांमध्ये कमी होते. त्यासाठी एकरी १० किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीतून द्यावे.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांचा माती परीक्षणानुसार वापर करावा. उदा. लोह (फेरस सल्फेट द्वारे) १० किलो प्रति एकर, जस्त (झिंक सल्फेट द्वारे) ८ किलो प्रति एकर, बोरॉन (बोरॅक्स द्वारे) २ किलो प्रति एकर या प्रमाणात जमिनीत सेंद्रिय खताबरोबर मिसळून द्यावे.
- फवारणीसाठी लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते चिलेटेड स्वरुपात असल्यास उपलब्धतता वाढते.
- चुनखडीयुक्त जमिनीसाठी सहनशील पिकांची उदा. कापूस, गहू, ऊस, सोयाबीन, सूर्यफूल, तूर, भुईमूग तसेच बोर, चिंच, आवळा, अंजीर इत्यादी फळपिकांची निवड करावी.
अधिक वाचा: तुमची जमीन चुनखडीयुक्त आहे हे कसे ओळखाल?