राज्यात ऊस लागवड सुरु: १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी, पुर्वहंगामी: १५ ऑक्टोंबर ते १५ नोंव्हेबर, आडसाली: १५ जुलै ते १५ ऑगस्ट ह्या तीन हंगामात केली जाते. सध्या आडसाली ऊस लागवडीची लगबग सुरु आहे.
आडसाली ऊस लागवडीसाठी महत्वाच्या गोष्टी
- आडसाली उसाच्या लागवडीची कामे ३० ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावीत.
- ऊस लागवडीसाठी दोन सरीमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी. ठेवावे. पट्टा पध्दतीसाठी मध्यम जमिनीत ९०-१५० सें.मी. व भारी जमिनीत ९०-१८० सें.मी. पट्टा पध्दतीचा अवलंब करावा.
- रोगग्रस्त किडग्रस्त शेतातील व खोडव्याचे बेणे लागणीस वापरू नये. ऊस बेणे मळ्यातीलच चांगले ऊस बेणे निवडून लागणीसाठी वापरावे.
- आडसाली लागण करताना को ८६०३२, फुले ०२६५, फुले ऊस १५०१२ आणि व्हीएसआय ०८००५ यापैकी कोणत्याही शिफारशीत वाणांचा जमिनीच्या मगदुरानुसार वापर करावा.
- ऊस बेणे लागण करण्यापूर्वी १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये १० मिनिटे बुडवावे आणि तेच बेणे परत १ किलो अॅसेटोबॅक्टर आणि १२५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ३० मिनिटे बुडवून ठेवावे व नंतर लागणीसाठी वापरावे, त्यामुळे नत्राच्या मात्रेत ५०% व स्फुरदाच्या मात्रेत २५% इतकी बचत होते.
- वाळवी किडीच्या नियंत्रणासाठी क्लोथीआनिडीन ५०% डब्ल्यू.डी. जी. हेक्टरी २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पंपाची तोटी (नोझल) काढून सरीतून सोडावे व मुळ पोखरणारी अळीच्या बंदोबस्तासाठी फिप्रोनिल ०.३% दाणेदार प्रति हेक्टरी २५ किलो सरीमध्ये चळीतून द्यावे.
- ऊस लागणीकरीता उसाच्या एक डोळा अथवा दोन डोळा टिपरीचा वापर करावा.
- हुमणी किडीचा बंदोबस्त करण्यासाठी, हुमणीग्रस्त ऊस पिकांची रोपे उपटावीत. जमिनीत मुळाशेजारी मिळालेल्या अळ्या गोळा करून रॉकल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात.
- आडसाली ऊसाची लागण केल्यानंतर जमिनीत वापसा आल्यानंतर (साधारण ३-४ दिवसांनी) ऊसातील तणांच्या बंदोबस्तासाठी ५० ग्रॅम अॅट्राझिन किंवा १५ ग्रॅम मेट्रीब्युझीन १० लिटर पाण्यात मिसळून संपुर्ण क्षेत्रावर फवारणी करावी.
- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
अधिक वाचा: तुकड्या तुकड्याने एफआरपी देण्याचा निर्णय चुकीचा; उल्लंघन कराल तर कोर्टात खेचू