इतर फळपिकांप्रमाणे आंबा पिंकामध्येही फुल व फळगळ होते. किड, रोग, हवामान बदल, जमिनीतील ओलावा इ. कारणांमुळे फळगळ होऊ शकते.
फुले येतात तेवढी फळधारणा होत नाही कारण झाडात जेवढी फळ पक्वतेची ताकत असते तेवढीच फळे झाडाला लागतात व अखेरपर्यंत फळ गळ चालूच असते.
आंबा फळगळीसाठी उपाय
- कोरडे हवामान आणि तापमानात होणारी वाढीमुळे झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता असते. वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांच्या अवस्थेत असलेल्या आंबा फळांची फळगळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसातून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे वाटाणा आकारापासून ते सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे.
- मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यामधील परागीकरण वाढविण्यासाठी मोहोर फुललेल्या अवस्थेत असताना सकाळच्या वेळेस (सकाळी ९ ते १२ वा.) हलका हलवून घ्यावा. फळधारणा झालेल्या झाडावरील मोहोरातील सुकलेल्या अवस्थेतील नर फुले दुपारच्या वेळेस कडक उन्हामध्ये झाडून घेतला असता किड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते, कीटकनाशकाची फवारणी अधिक प्रभावशाली होवून फळांची वाढ चांगली होते.
- आंबा फळांची गळ कमी करण्यासाठी आणि फळांची प्रत सुधारण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकूण तीन फवारण्या कराव्यात.
- वाढणारे कमाल तापमान लक्षात घेता हापुस आंब्यामध्ये फळगळ कमी करण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर २० पीपीएम नॅप्थेलीन ऍसीटीक ऍसीड (१ ग्रॅम ५० लिटर पाण्यातुन) या संजिवाचे द्रावण मोहोरावर फवारावे. दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची झाल्यावर करावी. नॅप्थेलीन ऍसीटीक ऍसीड प्रथम थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळुन नंतर पाण्यात मिसळावे.
- आंबा फळांचे फळमाशी पासून तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहीत फळांसाठी, गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉ.बा.सा.कों.कृ.विद्यापीठाने दिलेल्या शिफारशी नुसार २५ x २० सें.मी. आकाराच्या कागदी/वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
टीपः मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत किटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे गरजेची असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून (सकाळी ०९.०० ते १२.००) फवारणी करावी. किटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किवा संध्याकाळच्या वेळेस करावी.
अधिक वाचा: Bhuimug Utpadan : भुईमुगातील शेंगाचे व तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी करा हे उपाय