इगतपुरी : तालुक्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, शेतकरी हैराण झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणते पीक घ्यावे, काय करावे, या चिंतेत असताना धामणगाव येथील शेतकरी योगेश गाढवे यांनी २० गुंठ्यांत नेत्रा समृद्धी काकडीची लागवड करून यशस्वी उदाहरण घालून दिले आहे.
सुमारे ३५ ते ४० दिवसांपासून त्यांच्या काकडीची बाजारात विक्री सुरू असून, या कालावधीत त्यांना सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. किरण मांडे यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती त्यांनी दिली.
सर्वाधिक दरात विक्री
वातावरणातील अनिश्चितता आणि सततचा पाऊस यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. योग्य पद्धतीचे सूक्ष्म नियोजन, खत-पाण्याचे व्यवस्थापन केल्यामुळे समृद्धी काकडीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. भरघोस उत्पादन मिळत असल्याचे चित्र दिसते.
नेत्रा समृद्धी काकडीचा आकर्षक रंग आणि गुणवत्ता पाहता बाजारात सर्वाधिक दरात विकली जात आहे. यशस्वी काकडी लागवडीचा अनुभव जाणून घेण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेटी देत आहेत. खत व पाण्याचे नियोजन केल्यास उत्तम उत्पादन मिळत असल्याची भावना गाढवे यांनी व्यक्त केली.
