Kanda Lagvad : उन्हाळ कांदा लागवड (Onion Cultivation) अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशात ९ लाख ६७ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचे चित्र आहे. तर मागील वर्षी या काळात ८ लाख १ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. त्यानुसार यंदा कांदा लागवडीत १ लाख ६६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. मात्र मागील वर्षीपेक्षा यंदा मात्र उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
देशभरात अंदाजे १० लाख हेक्टरहून अधिक रब्बी कांद्याची लागवड (Kanda Lagvad) केली जाते. तर महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. यात नाशिक जिल्ह्यातून (Nashik Kanda Lagvad) देशासाठी लागणारा सर्वाधिक कांदा पुरवठा होतो. खरीप, उशिराचा खरीप, रब्बी, अशा तीन हंगामांत कांदा लागवड होते. यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उन्हाळी कांदा लागवड होताना दिसत आहे. ही लागवड टप्प्याटप्याने होत असून ऑक्टोबरपासून अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
एकीकडे देशातील यंदाची रब्बी कांदा लागवडीची (Kanda Lagvad) स्थिती आणि उत्पादनाचा अंदाज पाहिला असता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशात ९ लाख ६७ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. तर मागील वर्षीपेक्षा यंदा १ लाख ६६ हजार हेक्टर इतकी वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत उन्हाळ कांदा बाजारात येण्यास सुरवात होईल. तत्पूर्वी कांदा लागवड मात्र टप्प्याटप्प्याने सुरु असल्याचे चित्र आहे. कारण मागील काही दिवसांत झालेला पाऊस, वातावरणीय बदल यामुळे कांद्याला मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांना दुबार लागवड करावी लागली. तरीदेखील यंदा लागवडीत काहीशी वाढ झाली आहे.
उत्पादन घटण्याची शक्यता
दुसरीकडे देशभरात अंदाजे ३०० ते साडे तीनशे लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होत असते. यंदाचा विचार करता कांदा लागवडीची थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनावर फारसा फरक पडणार नाही. कारण खरीप आणि रब्बी दोन्ही मिळून जवळपास २० टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. जर मागील वर्षीच्या उत्पादनाचा विचार केला तर तो ३०० लाख मेट्रिक टन इतका होता. त्यानुसार यंदा २० टक्क्यांच्या वाढीनुसार साधारण ३७० लाख मेट्रिक टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र त्यातही सद्यस्थिती त किंवा मागील काही दिवसांचे वातावरण कांद्याला पोषक नसल्याचे चित्र आहे, याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहेच. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कांद्याला फटका बसून १४-१५ टक्क्यांनी उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
त्यानुसार यंदा देशभरात जास्तीत जास्त ३५० लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होईल, असा अंदाज आहे. यातही ७० लाख मेट्रिक टन कांदा देशाला लागतो. तर २५-३० लाख मेट्रिक कांद्याची निर्यात होते. दुसरीकडे ५ लाख टन नाफेड खरेदी करत असते, असा कयास आहे. तर जवळपास २० लाख मेट्रिक टन कांदा प्रक्रियेसाठी वापरला जातो आणि २०-३० लाख टन कांदा खराब होतो, वजन कमी होतो, किंवा इतर कारणामुळे बाजारात नेण्याजोगे नसतो. तर इतर कांदा इतर ठिकाणी वापरला जातो.