Jowar Market : कधीकाळी खरीप हंगामातील महत्त्वाचे आणि हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखली जाणारी ज्वारी सध्या बाजारपेठेत पूर्णपणे दुर्लक्षित होत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात दिसून येत आहे. (Jowar Market)
मजुरीचे वाढलेले दर, खत व बियाण्यांची प्रचंड महागाई आणि पावसाची अनिश्चितता यामुळे ज्वारीचा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. मात्र, या वाढत्या खर्चाच्या तुलनेत बाजारात मिळणारे दर निच्चांकी पातळीवर घसरल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. (Jowar Market)
याचा थेट परिणाम ज्वारीच्या लागवड क्षेत्रावर होत असून, वर्षागणिक ज्वारीची पेरणी कमी होत चालली आहे. सध्याच्या परिस्थितीत ज्वारी हे पीक हळूहळू जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे. (Jowar Market)
१० क्विंटलची अल्प आवक; बाजारपेठ ओस
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत १९ डिसेंबर रोजी खरीप ज्वारीची केवळ १० क्विंटल इतकी अल्प आवक नोंदविण्यात आली. आवक कमी असल्यामुळे दर वाढतील, अशी अपेक्षा असतानाही प्रत्यक्षात ज्वारीला प्रतिक्विंटल फक्त १ हजार ४२० रुपये असा निच्चांकी दर मिळाला. हा दर उत्पादन खर्चाशीही जुळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खर्च वाढला, दर घसरले
गेल्या काही वर्षांत खत, बियाणे, कीटकनाशके तसेच मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एका एकर ज्वारीच्या लागवडीसाठी येणारा खर्च लक्षात घेतला, तर सध्याचा बाजारभाव शेतकऱ्यांना तोट्यात नेणारा ठरत आहे. त्यातच दरवर्षी पावसाची अनियमितता कायम असल्याने ज्वारीचे पीक अधिक जोखमीचे बनले आहे.
इतका खर्च करूनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणीच बंद केली असल्याचे वास्तव समोर येत आहे. काही शेतकरी ज्वारी केवळ घरगुती वापर किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी घेत असल्याचेही चित्र आहे.
बाजार समितीत आवक घटण्यामागचे वास्तव
ज्वारीला समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी माल बाजारात आणण्यास तयार नाहीत. काही शेतकरी ज्वारी जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरत आहेत, तर अनेकांनी सोयाबीन, कापूस किंवा इतर नगदी पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्वारीच्या आवकेवर होत असून, आवक दिवसेंदिवस घटत चालली आहे.
हमीदराची मागणी जोर धरतेय
अन्य पिकांप्रमाणेच ज्वारीलाही शासनाने निश्चित हमीदर (MSP) जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. हमीदर मिळाल्यासच ज्वारीला राजाश्रय मिळू शकतो; अन्यथा पुढील हंगामात ज्वारीची लागवड आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
'इतक्या खर्चानंतरही ज्वारीला योग्य भाव मिळत नाही. शासनाने हमीदर जाहीर केल्याशिवाय शेतकरी ज्वारीकडे वळणार नाही.'- सुनील इढोळे, शेतकरी
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : वाशिम बाजार समितीत हळदीला उच्चांकी दर; मागणीचा मिळतोय फायदा
