Pune : पुणे मार्केट यार्डात आज (१६ डिसेंबर) पहिली कर्नाटक हापूस आंब्याची पेटी दाखल झाली आहे. सर्वसाधारणपणे एप्रिल मे महिन्यात खायला मिळणारा हापूस आंबा आता डिसेंबर महिन्यातच मार्केटमध्ये दाखल झाला आहे. पण नक्कीच हा बिगरहंगामी आंबा असून हंगामी आंबा यायला अजूनही वेळ आहे.
पुणे मार्केट यार्डमध्ये आज एकूण ६ पेटी आंब्याची आवक झाली होती. तर यामध्ये २६ डझन आंबे होते. दरम्यान, फळांचे व्यापारी रोहन उरसळ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ डझनच्या पेटीसाठी ५ हजार १०० तर ५ डझनच्या पेटीसाठी ३ हजार १०० रूपयांचा दर मिळाला आहे. ५ डझनच्या पेटीमध्ये असलेल्या आंब्याचा आकार लहान असल्यामुळे त्यांना दर कमी मिळाला.
दरम्यान, रविवारीही पुणे मार्केट यार्डमध्ये लालबाग आंब्याची पेटी दाखल झाली होती. दरवर्षी या आंब्याचा हंगाम मार्च ते एप्रिल महिन्यात सुरू होतो पण डिसेंबरच्या मध्यातच या आंब्याची पहिली पेटी बाजारात दाखल झाली आहे. लालबाग आंब्याच्या पेटीचे वजन १६.५ किलो एवढे होते तर यातील ४ डझनच्या पेटीला १८०० रूपये एवढा दर मिळाला होता.
यंदा राज्यात अन् देशात चांगला पाऊस झाल्यामुळे आंबा पीक चांगले येण्याची शक्यता आहे. हंगामी आंबा यायला अजूनही चार महिन्यांचा कालावधी आहे. पण त्यातच येणाऱ्या हिवाळा, धुके आणि वातावरणीय बदल यामुळे मोहोरावर परिणाम होऊ शकतो. निसर्गाने साथ दिली तर २०२६ चा हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगला जाईल.
