Join us

हमालांचे अचानक वाराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन; शेतकऱ्यांनी विरोध केल्याने कांदा लिलाव बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 10:42 IST

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (२ ऑगस्ट) अचानक हमालांनी वाराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन केले. या भाववाढीस शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने कांदा लिलाव बंद ठेवले. व्यापाऱ्यांनी समजूत काढल्यावर अखेर सायंकाळी लिलाव सुरू झाले.

सोपान भगत

अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (२ ऑगस्ट) अचानक हमालांनी वाराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन केले. या भाववाढीस शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने कांदा लिलाव बंद ठेवले. व्यापाऱ्यांनी समजूत काढल्यावर अखेर सायंकाळी लिलाव सुरू झाले.

माथाडी कामगार उपायुक्तांनी नुकतीच कांदा वाराईमध्ये दोन रुपये वाढ केल्याचा आदेश काढला. या आदेशानुसार वाराईमध्ये भाववाढ करण्याची मागणी करीत घोडेगाव येथील हमालांनी शनिवारी अचानक काम बंद आंदोलन केले. या भाववाढीस शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत कांदा लिलाव बंद ठेवले.

सध्या हमालांना एका क्विंटलला ११ रुपये ८८ पैसे हमाली, तर एक रुपया गोणी वाराई हमालांना मिळते. मात्र, तीन रुपये वाराई करण्याची मागणी हमालांनी केली. त्यास शेतकऱ्यांनी विरोध करून लिलाव बंद ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे सायंकाळपर्यंत लिलाव बंद होते.

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत आजचा दिवस लिलाव करू द्या, सोमवारपासून आपण लिलाव बंद ठेवू, असे सांगितल्यावर सायंकाळी साडेचार वाजेनंतर कांदा लिलाव सुरू झाले. रात्री दहा वाजेपर्यंत ते सुरू होते.

उत्पादनखर्चही निघत नाही. त्यात तीन रुपये प्रति गोणी वाराई, म्हणजे दोनशे पट वाढीचा आदेश माथाडी कामगार उपायुक्तांनी काढले. याबाबत शेतकरी किंवा प्रतिनिधींना कुठलीही पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. - महेश निकम, कांदा उत्पादक, देवगाव.

माथाडी कामगार उपायुक्तांनी कांदा गोणी वाराई एक रुपयाहून तीन रुपये केली. याबाबत व्यापारी किंवा शेतकरी संघटनांशी चर्चा केली नाही. नगर जिल्ह्यात वा इतर कुठल्याही तालुक्यात या भाववाढीची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे घोडेगाव येथे शेतकरी आक्रमक झाले. - अशोक येळवंडे, अध्यक्ष, कांदा व्यापारी असोसिएशन.

हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :अहिल्यानगरकांदाबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डशेतकरीशेती