Join us

गणेशोत्सव व दसरा, दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर बेदाणा दरात तेजी येईल का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:47 IST

bedana bajar bhav शेतकरी संघटनांकडून चिनी बेदाण्याच्या नावाखाली दर पाडण्याचा आरोप होत आहे. महिन्यात जून बेदाण्याचे दर वाढले होते.

अशोक डोंबाळेसांगली : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी बेदाणा हा केवळ उत्पादन नाही, तर त्यांच्या अर्थकारणाचा मुख्य आधार आहे. पण, गेल्या दोन महिन्यांत बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो ५० रुपयांची घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

राज्यात ५० हजार टन बेदाणा शिल्लक असतानाही नवीन पीक येण्यास सहा महिने बाकी आहेत. अशा परिस्थितीत गणेशोत्सव आणि दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर दरात तेजी येईल का? हा प्रश्न आता सर्वांच्या मनात घुमतो आहे.

शेतकरी संघटनांकडून चिनी बेदाण्याच्या नावाखाली दर पाडण्याचा आरोप होत आहे. महिन्यात जून बेदाण्याचे दर वाढले होते. चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला ३५ वर्षांत प्रथमच प्रतिकिलो ४०० ते ४५० रुपये दर मिळत होता. पण, अवघ्या दोन महिन्यांतच हे दर खाली घसरले आहेत.

सध्या चांगल्या प्रतीचा बेदाणा ३५० ते ३९५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. याचा अर्थ असा की, शेतकऱ्यांच्या हातात येणारा पैसा थेट ५० ते ६० रुपयांनी कमी झाला आहे.

शेतकरी नेते आणि द्राक्ष उत्पादक संघटनेचे पदाधिकारी याबाबत बोलताना म्हणतात, हे दर कमी होण्यामागे काही व्यापाऱ्यांची चाल आहे.

तेजीची शक्यता?तासगाव-सांगली बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार म्हणाले, जून महिन्याच्या तुलनेत सध्या बेदाण्याचा प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांनी दर उतरला आहे. सणांच्या काळात मागणी वाढेल आणि शिल्लक साठा कमी असल्याने दर वाढू शकतात. या आठवड्यात प्रतिकिलो २० ते ३० रुपयांची वाढ सुरू झाली आहे.

५० हजार टन शिल्लकराज्यात सध्या ५० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. सांगली, तासगाव, पंढरपूर आणि विजापूर या प्रमुख कार्यक्षेत्रातील १६० शीतगृहांमध्ये हा साठा आहे. नवीन द्राक्ष पीक येण्यास सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी हा शिल्लक साठा पुरेसा ठरणार नाही, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. दर कमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी व्यापाऱ्यांची खेळीबेदाणा उत्पादक महेश पाटील म्हणाले, आम्ही वर्षभर कष्ट करतो, पण बाजारातील हे खेळ आम्हाला उद्ध्वस्त करतात. सणासुदीत मागणी वाढेल अशी आशा आहे, पण सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. हे बदल शेतकऱ्यांच्या जीवनावर थेट परिणाम करतात. सरकार आणि संघटनांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे.

अधिक वाचा: काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न

टॅग्स :द्राक्षेसांगलीबाजारमार्केट यार्डशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीगणेशोत्सव 2025दिवाळी 2024दसरा