पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात सळसळणाऱ्या 'सात्या' (जंगली अळंबी) या रानभाजीने या वर्षीच्या बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. भंडारा शहरात पाव किलो सात्यांना ३०० रुपये तर अनेक बाजारपेठांमध्ये प्रतिकिलो १,२०० रुपयांपर्यंतचा विक्रमी दर मिळतो आहे. यामुळे हंगामी रोजगारात वाढ झाली आहे. एवढ्या उच्च किमती असूनही अळंबीप्रेमींमध्ये या भाजीची मागणी वाढतच आहे.
भंडारा जिल्ह्यात सात्यांचा हंगाम केवळ १५ ते २० दिवसांचा असतो. वारूळ, ओलसर झाडे, बासाच्या बेटांखाली उगवणारी ही रानभाजी खवय्य्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी कृत्रिम जरी खास सात्यांची चव आणि पौष्टिकता असल्याने ग्राहक अधिक पैसे देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. श्रावण महिन्यात अनेक नागरिक आवडीने सात्या खरेदी करताना दिसतात.
रोजगारासाठी पहाटेपासून सुरू होते भटकंती
ग्रामीण भागातील अनेक महिला आणि युवक पहाटेपासून जंगलात जाऊन सात्या गोळा करतात. या हंगामी भाजीमुळे ग्रामीण महिलांना आणि युवकांना अल्पकाळाचा रोजगार मिळतो, जे ग्रामीण अर्थकारणासाठी महत्त्वाचे ठरते.
रक्तदाब व वजन नियंत्रणासाठी गुणकारी
सात्यांमध्ये व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, झिंक, आयर्न, सिलेनियम यांसारखी पोषकद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात. यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे हाडे मजबूत राहतात, वजन नियंत्रणात मदत होते, आणि रक्तदाब संतुलित राहतो. त्यामुळे सात्यावर 'शाकाहारी मटण' अशीही लोकप्रिय ओळख आहे.
जीव धोक्यात घालून गोळा केला जातो रानमेवा
• ही रानभाजी मिळवण्यासाठी घनदाट जंगलात जाऊन विषारी जातींपासून खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. साप, विंचू, वन्यप्राणी यांचा सामना करत ग्रामीण मंडळी ही बहुमूल्य भाजी घेऊन येतात.
• सात्यांची मर्यादित उपलब्धता, आकर्षक चव आणि पोषणमूल्य, उच्च दर आणि ग्रामीण क्षेत्राला मिळणारा रोजगार यामुळे भंडारा जिल्ह्यात सात्यांचा 'तोरा' सध्या शिगेला पोहोचला आहे.
मध्य प्रदेश व गोंदियातून होते सात्यांची आयात
जिल्ह्यात कोका व उमरेड-कहांडला वन्यजीव अभयारण्य बफर झोन, न्यू नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर झोन या भागातील ग्रामीणांकडून भंडारा शहरात सात्यांची आवक होत आहे. परंतु, मागणी अधिक व भावही चांगला मिळत असल्याने जवळच्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातून तसेच गोंदिया जिल्ह्यातील देवरी भागातून सात्याची आयात केली जात आहे.
सात्या विक्रीतून हंगामी रोजगार उपलब्ध होतो. मागणी अधिक असल्याने बालाघाट व देवरी भागातून सात्याची आयात केली जाते. सध्या प्रति किलो १,२०० रुपयांचा भाव मिळत आहे, कुटुंबातील अन्य मंडळीही या व्यवसायासाठी मदत करतात. - कमलाबाई बादशहा, सात्या विक्रेती.