Join us
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमी उत्पादनाची कुणाला सांगावी कथा टोमॅटो दराने रडवले रे दादा; शेतकरी सांगताहेत व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 20:19 IST

Tomato Market Rate : एका पाठोपाठ एक येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे पारंपरिक पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. अशा परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यावर भर दिला. त्याचा परिणाम यंदा टोमॅटोचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे बाजारात मातीमोल भावाने शेतकऱ्यांना टोमॅटोची विक्री करावी लागत आहे.

बालाजी बिराजदार 

एका पाठोपाठ एक येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे पारंपरिक पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. अशा परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यावर भर दिला. त्याचा परिणाम यंदा टोमॅटोचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे बाजारात मातीमोल भावाने शेतकऱ्यांना टोमॅटोची विक्री करावी लागत आहे.

मागील काही दिवसांत ८० रुपये किलो दराने विक्री होणारे टोमॅटो सध्या दहा रुपये प्रति किलो दराने विक्री करावे लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. एवढा खर्च करूनही हाती काहीच शिल्लक राहात नसल्याने जनावरांपुढे टोमॅटो टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पेरलेलं उगवेल अन् उगवलेलं योग्य भावात विकेल, याची शेतकऱ्यांना कधीच खात्री नसते. या वर्षी खरीप हंगामातही असाच अनुभव आला. सोयाबीन, तूर ही पिके जोमात आली. पण उत्पादनात घट आल्याने हाती आलेल्या पिकांना भाव मिळून काहीतरी पदरात पडेल ही आशा फोल ठरली. बाजारात सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

त्यातच काही शेतकऱ्यांनी फुलकोबी, टोमॅटोचे उत्पादन घेण्यावर भर दिला. मात्र, यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतल्याने बाजारात आवक वाढली. परिणामी दर घसल्याची स्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांकडून व्यापारी दहा रुपयात दोन किलो टोमॅटो विकत घेत असून, बाजारात मात्र दहा रुपयाला प्रति किलो या दराने विक्री करत असल्याचे चित्र आहे.

८० ला टच झाला होता !

काही महिन्यांपूर्वी बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. एकही भाजी ६० रुपये प्रति किलोच्या खाली नव्हती. टोमॅटोनेही ८० पार केली होती. मात्र, बाजारात आवक वाढताच टोमॅटोची लाली फिकी पडली. यामुळे उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.

हा रुपयात दोन किलो

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने त्याचा परिणाम टोमॅटो दरावर झाला आहे. कुठे दहा रुपये किलो तर कुठे दहा रुपयात दोन किलो टोमॅटो विक्री होत असल्याची स्थिती आहे.

तोडणी, वाहतुकीचे वांदे !

• शेतमाल बाजारात येताच भाव घसरतात अशी स्थिती शेतकऱ्यांना नेहमीच अनुभवयास मिळत आहे. यंदा कोबी पाठोपाठ टोमॅटोने निराश केले.

• बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने तोडणी, वाहतु‌कीचाही खर्च निघणे मुश्कील झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

• शहराच्या ठिकाणी काही भाजी विकते फिरून भाजीपाला विक्री करतात. त्यांच्याकडूनदेखील ग्राहकांना केवळ १० रुपयांत एक किलो टोमॅटो उपलब्ध होत आहेत. एकूणच टोमॅटोचे दर कमालीचे खाली आल्यामुळे उत्पादकांना झालेला खर्च निघणेही कठीण झाले आहे.

वैशाली वाणाची लागवड, मागणी जास्त

वैशाली वाणाचे टोमॅटो तोडल्यानंतर इतर वाणांच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात. ट्रान्सपोर्ट दरम्यानही खराब होत नाही. तसेच चवीलाही आंबट कमी असतात. नागरिकांतून या टोमॅटोला अधिक मागणी असते. त्यामुळे उत्पादक शेतकरी वैशाली वाणाच्या टोमॅटोची लागवड करण्यावर भर देतात.

यंदा खरीप हंगामातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. मात्र, विक्रीसाठी बाजारात घेऊन आल्यावर धक्काच बसला. कवडीमोल दराने खरेदी होत आहे. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो जनावरांसमोर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. - लक्ष्मण भोंडवे, शेतकरी, मोघा (खुर्द) जि. धाराशिव.

अर्ध्या एकरवर टोमॅटोची लागवड केली. यासाठी ४० हजार रुपये खर्च झाला. सध्या भाव कमी असल्याने लागवडीचाही खर्च निघत नाही. त्यात अजून अर्धा एकरवर ३ हजार टोमॅटोची रोपे लावली असून उन्हाळ्यात भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. - संतोष गरगडे, शेतकरी, मोघा (खुर्द) जि. धाराशिव.

हेही वाचा : बाजारात वर्षभर मागणी असलेल्या 'या' उत्पादनाची करा निर्मिती; बाजरीचे मूल्यवर्धन होऊन उपलब्ध होतील रोजगार संधी

टॅग्स :टोमॅटोशेतकरीशेतीमार्केट यार्डधाराशिवशेती क्षेत्रभाज्या