Join us

पिवळ्या सोन्याचे दर कधी वाढणार? हळद उत्पादक शेतकरी दर वाढीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:10 IST

Turmeric Market Rate Update : नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली; परंतु काही दिवसांपासून हळदीला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे पुढील हंगामात हळदीची लागवड करावी की नाही? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली; परंतु काही दिवसांपासून हळदीला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे पुढील हंगामात हळदीची लागवड करावी की नाही? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

गतवर्षी ३० हजार रुपयांपर्यंत हळदीचा भाव गेला होता; परंतु यावर्षी हळद आवक सुरू झाल्यापासून १४ हजारांच्या पुढे भाव जात नाही. हळदीला अत्यल्प भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च व मजुरीही निघत नाही.

हळदीची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभाग वेळोवेळी करते; परंतु भाव द्यायची वेळ आली की, त्यात खंडीभर त्रुटी काढून काही मोजक्याच हळदीला भाव देऊन शेतकऱ्यांना चिडीचूप केले जाते.

फेब्रुवारी महिन्यापासून हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातील मोंढ्यात हळदीची आवक सुरू झाली आहे. बुधवारी झालेल्या लिलावात १२ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला.

त्याअगोदर गत आठवड्यात हळदीला १४ हजार ५०० पर्यंत भाव मिळाला. अशा प्रमाणे अत्यल्प भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांनी हळदीची लागवड कशी करावी? असा प्रश्न विचारला जात आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव या गावांत हळदीची अधिक लागवड केली जाते. १२ ते १४ हजार रुपये भाव हळदीला मिळत असेल तर शेतकरी पुढील हंगामात लागवड करणार नाहीत, असेच सध्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सर्वच शेतीमालाचे भाव गडगडले...

तालुक्यात काही दिवसांपासून भुईमूग काढणे सुरू झाले आहे. बुधवारी बिटात भुईमुगाला प्रति क्विंटल ५६५० रुपयांचा भाव मिळाला. सद्यःस्थितीत हरभरा पिकास ५२०० रुपयांचा भाव मिळत आहे. नगदी पीक असलेल्या सोयाबीनने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. आजमितीस सोयाबीनला ३६०० पासून ४२२५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

शेतकरी काबाडकष्ट करणारा वर्ग आहे. कुटुंबाचा गाडा चालावा म्हणून रात्रंदिवस मेहनत करून उसनवारी करत हळदीची लागवड करतो; परंतु बिटात त्रुटी काढून भाव अत्यल्प दिला जातो आहे. - मोहसीन शेख, शेतकरी.

महागाईने कळस गाठला आहे. अशा परिस्थितीत सालगडी ठेवणे कठीण झाले आहे. शेतकरी घरातील सदस्यांना सोबत घेऊन शेती करू लागले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायला पाहिजे, परंतु मदत काही मिळत नाही. - फुलाजी इंगोले, शेतकरी.

हेही वाचा : ढेगे पिंपळगावच्या शेतात पिवळ्या टरबूजचा यशस्वी प्रयोग; ओमरावांनी घेतले ४० गुंठयात दोन लाख चाळीस हजारांचे उत्पन्न

टॅग्स :बाजारशेतकरीशेतीहिंगोलीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपीकविदर्भमराठवाडा