खामगाव : तालुक्यासह परिसरात गव्हाची काढणी सुरू झाली असून, नवीन गहूबाजारात (Wheat Market) दाखल झाला आहे. अशातच शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Wheat Market) गव्हाचे दर २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलने कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मागील काही आठवड्यांपासून गव्हाचे दर स्थिर होते. दरम्यान स्थानिक बाजारात गव्हाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे बाजारात गव्हाची तात्पुरती किमान किंमत कमी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा कष्टांचा योग्य मोबदला मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मते, यामुळे त्यांचे आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे.
असे मिळाले दर!
जास्तीत जास्त - २६५०
सर्वसाधारण - २५७५
कमीत कमी - २५००
दर कोसळले कसे?
पाऊस, हवामान आणि खतांची दरवाढ यासारख्या विविध अडचणी नंतर दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादनात वाढ झाली असली तरी, बाजारातील पुरवठा व शासनाच्या धोरणांमुळे दरांवर परिणाम झाला आहे.
शेतकऱ्यांमध्ये असंतोष
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे. गव्हाचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा असताना, बाजारात अशी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे. अनेक शेतकरी या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना शोधत आहेत.
मॉईश्चरमुळे नवीन गव्हाला दर कमी !
काही भागातील नवीन गव्हाची बाजार समितीत आवक सुरू आहे. या गव्हामध्ये मॉईश्चरचे प्रमाण अधिक असल्याने दर कमी मिळत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले, तसेच खामगाव मध्ये आवक फारशी नसली तरी इतर ठिकाणी गव्हाची आवक वाढली आहे.
शासनाचा हस्तक्षेप आवश्यक !
खामगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, गव्हाच्या बाजार दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील दर व शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे.
याशिवाय, शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्ज व इतर मदतीचे नियम सुलभ करावेत, जेणेकरून त्यांना वित्तीय संकटांवर मात करता येईल.
ग्रामीण भागात सर्वत्र माल उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गव्हाचे दर कोसळले. फ्लोअर मिल व्यावसायिकांना हा माल जात आहे. - सत्यनारायण चांडक, व्यापारी
हे ही वाचा सविस्तर : Wheat Market : गव्हाचे अर्थकारण कसे आहे ते जाणून घ्या सविस्तर