संजय लव्हाडे
केंद्र सरकारने मे महिन्यासाठी साखरेचा कोटा २२ लाख ५० हजार टन जाहीर केला आहे. मात्र, हा कोटा जाहीर होताच साखरेच्या दरात तेजी आली आहे. गहू, मका, सोयाबीन व गूळ बाजारात तेजी आली असून, सोने व चांदीमध्ये मात्र भाव स्थिर आहेत. विशेष म्हणजे सोयाबीनमध्ये मोठी तेजी आली असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने मे महिन्याचा साखरेचा कोटा २२ लाख ५० हजार टन जाहीर केला आहे. हा कोटा जाहीर होताच साखरेवर सटोरियांची पकड मजबूत झाली आहे. त्यामुळे साखरेमध्ये तत्काळ ५० ते १०० रुपये तेजी आली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने साखरेची मागणीही मोठ्या प्रमाणात असूनही साखरेचा कोटा कमी आल्याने यामध्ये तेजी आली आहे.
साखर कारखान्याचे भाव ३,८०० ते ३,९५० प्रति क्विंटल आहेत, तर जालना बाजारपेठेत साखरेचे किरकोळ भाव ४,२०० ते ४,३५० प्रति क्विंटलवर जाऊन पोहचले आहे. गुळाची देखील आवक कमी झाली आहे. त्यामुळे गुळाचे भाव साखरेपेक्षा अधिक झाले आहेत. गुळाचे भाव ४,२०० ते ४,८०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत.
राज्यातील कृषी बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या पाच दिवसांत सोयाबीनचे दर ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेले असून, ४,७०० ते ७,००० रुपये प्रति क्विंटल, असा उच्चांकी दर नोंदविण्यात आला.
सोयाबीनला सहा हजारांच्या पुढे भाव कायम राहिल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सुमारे तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा सोयाबीनच्या दराने सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या बाजारात सोयाबीनला ४,७०० ते ७,००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.
यंदा मक्याचा भाव हमीभावापेक्षाही कमी राहिला असून, उत्पादन वाढल्याने आणि मागणी चांगली असल्याने तेजी आली आहे. मकाची आवक दैनंदिन ५ हजार पोत्यांची असून, सध्या मका १,३५० ते २,००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला जात आहे.
बाजारभाव प्रति क्विंटल
गहू - २,२०० ते ५,००० ज्वारी - २,१०० ते ४,४०० बाजरी - २,००० ते २,३००मका - १,३५० ते २,००० गावरान चना - ५,००० ते ५,४०० सोयाबीन - ४,७०० ते ७,००० साखर - ४,२०० ते ४,३५० गुळ - ४,२०० ते ४,८००रेशीम कोष - ५८,०००
सोने १.५२ लाख रुपये तोळा
• डॉलर्सच्या मागणीचा सोन्यावर परिणाम होत असून, सोन्याचे भाव उतरत असल्याचे चित्र आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आयातीचा खर्च वाढत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे.
• परिणामी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण होत असून, गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पुढील काही दिवसांत जागतिक परिस्थितीनुसार या बाजारातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
• सोन्याचे भाव १ लाख ५२,००० प्रति तोळा, तर चांदी २ लाख ४८,००० प्रति किलो असे आहेत.
मका बाजारपेठेत तेजी?
मकामध्ये बाजारपेठेत तेजी राहण्याची शक्यता आहे. पोल्ट्री फार्म व कपड्यांना अधिक मजबुतीसाठी मका स्टार्चसाठी मागणी मोठी आहे. इथेनॉलसाठी मक्क्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने तेजीची शक्यता नाकारता येत नाही.
Web Summary : Grain, maize, soybean, and jaggery prices are rising. Sugar prices increased due to a reduced quota. Soybean prices are providing relief to farmers. Gold and silver prices remain stable. Maize market may see further gains.
Web Summary : गेहूं, मक्का, सोयाबीन और गुड़ की कीमतों में वृद्धि हुई है। कोटा कम होने से चीनी की कीमतों में तेजी आई है। सोयाबीन की कीमतों से किसानों को राहत मिली है। सोना और चांदी की कीमतें स्थिर हैं। मक्का बाजार में और तेजी देखने को मिल सकती है।