Join us

वाराई दरवाढीस स्थगिती; 'या' जिल्ह्यातील प्रसिद्ध कांदा बाजारातील लिलाव पुन्हा एकदा पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:32 IST

वाराई दरवाढीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने दोन दिवस प्रमुख कांदा बाजार असेलला घोडेगाव येथील कांदा लिलाव बंद होते. माथाडी कामगार आयुक्तांनी २० ऑगस्टपर्यंत वाराई दरवाढीस स्थगिती दिल्याने शनिवारी (९ ऑगस्ट) कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले.

सोपान भगत

वाराई दरवाढीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने दोन दिवस अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख कांदाबाजार असेलला घोडेगाव येथील कांदा लिलाव बंद होते. माथाडी कामगार आयुक्तांनी २० ऑगस्टपर्यंत वाराई दरवाढीस स्थगिती दिल्याने शनिवारी (९ ऑगस्ट) कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले. मात्र, कांदा दरात घसरण कायम राहिली.

माथाडी कामगार आयुक्तांनी मागील आठवड्यात वाराई एक रुपयावरून तीन रुपये करण्याचा आदेश काढला होता; परंतु ही दरवाढ शेतकऱ्यांनी अमान्य करीत आंदोलन केले. त्यामुळे दोन दिवस कांदा लिलाव बंद होते. त्यानंतर आयुक्तांनी वाराई दरवाढीच्या आदेशाला २० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिल्याने मागील वाराई दराप्रमाणे शनिवारी लिलाव सुरू झाले.

शनिवारी घोडेगाव उपबाजारात ५४ हजार १८५ कांदा गोण्यांची आवक झाली. त्यातील एक-दोन वक्कलसाठी १४०० ते १६०० रुपये भाव मिळाला, तर सरासरी कांद्याला एक हजार ते १२०० रुपये भाव होता. एक नंबर कांदा १२०० ते १५०० रुपये, दोन नंबर- एक हजार ते १२०० रुपये, तर तीन नंबर- ८०० ते १००० रुपये आणि गोल्टी मालास ७०० ते ८०० रुपये दर मिळाला.

आवक वाढल्याने दरात घसरण

भारतीय कांदा खरेदी करणाऱ्या देशांनी कांदा आयात करण्यासाठी सीमा बंद केल्याने बाजारात कांद्याला मागणी नाही. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दरात घसरण होत असल्याचे अडतदार संभाजी पवार म्हणाले.

बांगलादेश सीमा खुली होणार

भारतीय कांदा खरेदी करण्यासाठी पुढील आठवड्यात बांगलादेश आपली सीमा खुली करणार असल्याचे समजते. बांगलादेशाची सीमा निर्यातीसाठी खुली झाल्यास, कांदा दरामध्ये २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल दरवाढ होऊ शकते, असे अडतदार संतोष वाघ म्हणाले.

कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये नवा कांदा बाजारात सुरू झाल्याने, महाराष्ट्राच्या कांद्याला कमी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ५० टक्के कांदा विक्रीसाठी आणून राहिलेल्या कांद्याबाबत परिस्थिती पाहून विक्रीचा निर्णय घ्यावा. - सुदामराव तागड, कांदा अडतदार, घोडेगाव.

बाजार समितीची भूमिका शेतकरी हिताचीच

श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमाल, मापाडी व व्यापारी बैठकीमध्ये वाराईबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. तसेच याबाबत बाजार समितीला शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. शेतकऱ्यांच्या मोकळा कांद्याला डम्पिंग ट्रेलरला हमाली देण्यात येऊ नये तसेच मोकळ्या कांद्याच्या झालेल्या वजनमापावर मापाई देण्यात येऊ नये, हीच भूमिका बाजार समितीची आहे, अशी माहिती सभापती सुधीर नवले व सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

गोणी मार्केट पूर्ववत सुरू

मोकळा कांदा मार्केट हमाली व मापाई वरून बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, गोणी मार्केट पूर्ववत सुरू असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही प्रकारे हमाली किंवा मापाईचा वाद तयार होत नाही. त्यामुळे गोणी कांदा मार्केट सोमवार, बुधवार व शुक्रवार पूर्ववत सुरू असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवक येत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कुठलाही संभ्रम मनात ठेवू नये व आपला कांदा समितीत विक्री करावा, असे आवाहन सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

हेही वाचा : 'धामणगाव'चा सेंद्रिय शेतीचा गट करतोय वार्षिक दीड कोटींची उलाढाल; समूह शेतीतून विकास साधणाऱ्या गावाची वाचा कहाणी

टॅग्स :अहिल्यानगरशेती क्षेत्रशेतकरीबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकांदामार्केट यार्ड