Join us

Vegetable Market Rate : भाजीपाल्याचे दर घसरले; उत्पादन खर्चही निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:49 IST

Vegetable Market Rate Update : बाजारात आवक वाढल्याने फुलकोबीचे दरही कोसळले आहेत. शहरात अनेकदा फुलकोबीचे ढीग लागलेले दिसत असून, दहा एक, असा भाव मिळतो आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

भंडारा जिल्ह्यात महिन्याभरापासून सततच्या ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. फुलकोबीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच बाजारात आवक वाढल्याने फुलकोबीचे दरही कोसळले आहेत. शहरात अनेकदा फुलकोबीचे ढीग लागलेले दिसत असून, दहा एक, असा भाव मिळतो आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात गत चार वर्षांपासून पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव यामुळे शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट होत आहे. त्यातच यंदा बाजारात भावही समाधानकारक मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी खरीप, रब्बी पिकांबरोबर भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहेत. परंतु, भाजीपाल्याची शेतीही आता बेभरवशाची झाली आहे.

मागील महिन्याभरापासून जिल्ह्यात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने भाजीपाला पिकावर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. परंतु, कीड नियंत्रणात येत नसल्याचे चित्र पहायवास मिळत आहे.

यंदा वातावरणाचा सर्वाधिक फटका फुलकोबीला बसला. त्यातच कोबीची आवक वाढल्याने बाजारात मिळणाऱ्या भावातून उत्पादन खर्चही भागेनासा झाला आहे. पडत्या भावात विक्री करावी लागत आहे. काढणीचा खर्चही वसूल होत नसल्याचे उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

फुलकोबीसह इतर भाजीपाल्याचीही वेगळी परिस्थिती तशीच आहे. सर्वच भाज्यांचे भाव घसरल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी करावे तरी काय, असा प्रश्न सतावत आहे. हिवाळाभर भाजीपाल्याचे दर पडत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

फुलकोबीने स्वप्न कोमेजले !

यंदा फुलकोबीला समाधानकारक भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, किडीचा हल्ला, पडत्या भावामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न कोमेजले आहे.

आवक अचानक वाढली

भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा फटका भाजीपाल्याला बसू लागला आहे. त्यातच भाजीपाल्याची आवक दुपट्टीने वाढली आहे. परिणामी, भाजीमंडईत भाव कोसळले आहेत. भावात झालेली घसरण कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविला जात आहे.

लॉट संपल्यावर कोबीला पुन्हा येणार भाव

सध्या मंडईत येत असलेला लॉट संपल्यावर कोबीला पुन्हा भाव येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या मात्र पडता भाव मिळत आहे.

यंदा चांगला भाव मिळेल या आशेने अनेकांनी भाजीपाला पिकांची लागवड केली. परंतु, १५ दिवसांपासून भाव पडलेले आहेत. - रामाजी नेरकर, भाजीपाला उत्पादक.

६० वरून १० रुपये भाव

पावसाळ्यात एक किलो फुलकोबीसाठी ५० ते ६० रुपये मोजावे लागत होते. आता मात्र १० रुपयांमध्ये एक कोणतीही एक कोबी विक्री होत आहे.

फूलकोबीला कशाचा फटका?

सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फुलकोबीसह इतर भाजीपाला पिकालाही फटका बसला आहे.

फुलकोबीपेक्षा ब्रोकोलीला जास्त भाव

फुलकोबीच्या तुलनेत ब्रोकोलीचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे भाव फुलकोबीपेक्षा जास्त आहे.

ब्रोकोली व फूलकोबीत फरक काय?

ब्रोकोली आणि फुलकोबी कूसिफेरस भाज्यांच्या एकाच कुटुंबातील आहेत. परंतु, दिसण्यात व चवीत भिन्नता आहे.

यंदा महिनाभरापासून भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. लागवडखर्चही वसूल होत नाही. सध्या फुलकोबी उत्पादकांना फटका बसला आहे. फुलकोबीसोबत इतर भाजीपाल्याचे दरही घटल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. - श्रीकृष्ण वनवे, भाजीपाला उत्पादक.

हेही वाचा : Success Story : शेतीपूरक जोडधंदाची धरली वाट; भारत पाटलांची संकटांवर मात  

टॅग्स :भाज्याबाजारशेतकरीशेतीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड