Join us

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन हजार डझन हापूस आंबा लंडनच्या बाजारपेठेमध्ये विक्रीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:27 IST

Hapus Mango : यावर्षी आंबा उत्पादन कमी असले तरी कोकणातील हापूसने युरोपवारी साधली आहे. 'ग्लोबल कोकण' संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांचा दोन हजार डझन हापूस लंडनच्या बाजारपेठेमध्ये विक्रीला पाठविण्यात आला आहे.

यावर्षी आंबा उत्पादन कमी असले तरी कोकणातील हापूसने युरोपवारी साधली आहे. 'ग्लोबल कोकण' संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांचा दोन हजार डझन हापूस लंडनच्याबाजारपेठेमध्ये विक्रीला पाठविण्यात आला आहे.

गुरुवारपासून हा आंबालंडनच्याबाजारात उपलब्ध झाला आहे. ज्याची भारतीय चलनाप्रमाणे लंडनमध्ये २१०० रुपये डझन दराने विक्री करण्यात आली.

कोकणातील हापूस आंब्याला योग्य दर मिळावा आणि येथील शेतकरी, बागायतदार यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने ग्लोबल कोकण या संस्थेच्या माध्यमातून 'हापूस आंबा अभियान' राबवण्यात येत आहे. त्यातून, लंडनच्या बाजारपेठेमध्ये हापूस आंबा पाठविण्यात आला आहे.

आमदार प्रसाद लाड यांच्यासह लांजा येथील आबिद काजी, रत्नागिरीतील कळंबटे, दीपक उपळेकर, दत्तात्रय तांबे, देवगड येथील नरेश डामरी व अन्य बागायतदारांनी युरोप येथे आंबा पाठविण्यासाठी नियोजन केले होते.

तेजस भोसले, सचिन कदम यांनी युरोपसाठी मार्केटिंगची व्यवस्था पाहिली. रत्नागिरी, राजापूर आणि देवगड येथील २ हजार डझन आंबा युरोपला पाठविण्यात आला आहे. त्यातील एक हजार डझन आंबा लंडनमध्ये तर उर्वरित युरोपमधील अन्य देशांत विक्रीसाठी पाठविला आहे.

हापूसला लंडनमध्ये चांगली मागणी आहे. त्यानुसार कोकणातून हापूस आंबे पाठवले जात आहेत. 'ग्लोबल कोकण'च्या माध्यमातून हा आंबा आला आहे. त्याला दरही चांगला मिळतो. यंदा प्रथम आलेल्या आंब्याचे ग्राहकांनी चांगले स्वागत केले आहे. युरोपिय देशांत हापूसचा प्रचार केला जात असून, त्यातून कोकणातील बागायतदारांनाही फायदा होणार आहे. - तेजस भोसले, लंडन.

हेही वाचा :  खडकाळ जमिनीवर कलिंगडातून नऊ लाखांचे उत्पन्न; गंगापूर येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

 

टॅग्स :आंबासिंधुदुर्गलंडनशेतकरीशेती क्षेत्रबाजाररत्नागिरी