हिंगोली : येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात (APMC) ६ फेब्रुवारी रोजी मागील चार दिवसांच्या तुलनेत हळदीचे (Turmeric) दर पाचशे रुपयांनी वधारले. तुरीच्या दरात मात्र घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मराठवाड्यासह विदर्भात हळद खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील संत नामदेव मार्केट यार्डात (Sant Namdev Market Yard) हंगाम संपला तरी सरासरी ७०० ते ८०० क्विंटल हळदीची आवक होत आहे.
यंदा मे, जूनमध्ये हळदीला उच्चांकी दर मिळाला होता. हा दर कायम राहील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, जून लागताच दरात घसरण झाली. सरासरी १४ ते १५ हजार रुपयांनी विक्री झालेली हळद जूननंतर मात्र ११ ते १२ हजारांखाली आली. त्यामुळे शेतऱ्यांना फटका बसला.
मागील चार दिवसांत मात्र हळदीच्या दरात वाढ झाली असून, गुरुवारी ११ हजार ५१५ ते १३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलने हळद विक्री झाली.
जवळपास पाचशे रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. तर तुरीच्या दरात मात्र घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.
मागील वर्षी ११ हजार रुपयांचा पल्ला गाठलेल्या तुरीला सध्या सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे.
दरकोंडीने सोयाबीन उत्पादक संकटात
* जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहतात. त्यामुळे इतर पिकांपेक्षा सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होतो. परंतु, मागील दोन वर्षांपासून सोयाबीन कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
* यंदा सोयाबीन ऐन भरात असताना येलोमोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यातच पावसाचा लहरीपणाही नडला. परिणामी, उत्पादन निम्म्याखाली आहे. अशा परिस्थितीत किमान सहा हजारांचा भाव मिळेल, अशी अपेक्षा होती.
* मात्र, सोयाबीन चार हजारांवर गेले नाही. या भावात लागवडखर्चही वसूल झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला.
असे वधारले हळदीचे भाव
दिनांक | किमान भाव | कमाल भाव | सरासरी भाव |
३ फेब्रुवारी | ११,३६० | १३,३६० | १२,३५० |
४ फेब्रुवारी | १०,९०० | १२,९०० | ११,९६० |
५ फेब्रुवारी | ११,००० | १३,००० | १२,०५० |
६ फेब्रुवारी | ११,५१५ | १३,५१५ | १२,५१५ |
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : मानवत बाजारात 'इतके' लाख क्विंटल कापूस खरेदी वाचा सविस्तर