गतवर्षी खुल्या बाजारात जुलै महिन्यात तुरीला ११ हजार रुपये क्विंटलचे दर मिळाले होते. यावर्षी देखील तुरीच्या दरात वाढ होईल अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यातून शेतकऱ्यांनी तूर राखून ठेवली. जुलै महिन्यात तूर विकायला काढली. याचवेळी तुरीची आयात झाली. बाजारात तुरीचे दर पडले. याचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.
पावसाळ्याच्या हंगामात तुरीचे दर वाढतात. यामुळे राखून ठेवलेली तूर जादा दर मिळवून देते. यातून पेरणीचा खर्च कमी करता येतो. याच प्रमुख उद्देशाने शेतकऱ्यांनी तूर राखून ठेवली. मात्र केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात तुरीची आयात केली. यातून तुरीचे दर ८ हजार रुपये क्विंटलवरून साडेसहा हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहे. यात तुरीला क्विंटल मागे दोन हजार रुपयांचा फटका बसला आहे.
शुक्रवारी यवतमाळच्या बाजारात तुरीची ७०० क्विंटलपर्यंत आवक होती. मात्र शेतमालाला दरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. आयात होणाऱ्या शेतमालाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
४,४०० रुपयांवर सोयाबीनचे दर
तूरी सोबतच सोयाबीनची आवक बाजारात वाढली आहे. यातून खुल्या बाजारात सोयाबीनचे दर खाली घसरले आहे. हे दर ४,००० ते ४,४०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.