वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांत मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात होत असलेली घसरण तूर्तास थांबली असून, या दरात काहिशी सुधारणाही झाली आहे. त्यात कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला हमीपेक्षा अधिक दर मिळत आहे. त्यामुळे बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे.
शुक्रवारी कारंजा बाजार समितीतच ३ हजार ५०० क्विंटल तुरीची आवक झाली होती. यंदाच्या हंगामातील नवी तूर दाखल होण्यापूर्वीच दरात घसरण सुरू झाली. मागील काही दिवसांपूर्वी तुरीचे सरासरी दर ७ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले होते. मागील आठवड्यापासून मात्र तुरीच्या दरातील घसरण थांबली आहे. १० हजार क्विंटल तुरीची आवक दरदिवशी होत आहे.
६६, ४३६ हेक्टरवर तुरीची पेरणी
वाशिम जिल्ह्यात सरासरी ५८ हजार ६१० हेक्टरवर तुरीची पेरणी अपेक्षीत असताना ६६ हजार ४३६ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. अर्थात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत जिल्ह्यात तुरीच्या क्षेत्रात जवळपास आठ हजार हेक्टरने वाढ झाल्याचे दिसत आहे.
तुरीला कोठे किती कमाल दर आणि आवक किती?
बाजार समिती | कमाल दर | आवक प्रति क्विंटल |
कारंजा | ७७०० | ३५०० |
वाशिम | ७६०० | ३१०० |
मानोरा | ७५५० | ३०० |
मंगरुळपीर | ७३५५ | १२०० |
रिसोड | ७४५० | २१४५ |
दर घसरण्याची शक्यता !
सरकारने तुरीच्या शुल्कमुक्त आयातीला ३१ मार्च २०२६ मुदतवाढ दिली आहे. सरकारने देशातील तुरीची पुरवठा वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पण यंदा देशातील तुरीची लागवड वाढली. त्यामुळे उत्पादनही वाढण्याचा अंदाज असल्याने तुरीचे दर घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजार समित्यांमध्ये दर घसरले !
* बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी ६ हजार ५२० क्विंटल तुरीची आवक बाजार समित्यांमध्ये झाली होती. कमीत कमी ६ हजार ५२० ते जास्तीत जास्त ७ हजार ५६२ असा दर असला तरीही प्रत्यक्षात सरासरी भाव हा प्रतिक्विंटल ७ हजार १८७ रुपये मिळाला.
* काही महिन्यांपूर्वी प्रतिक्विंटल १० हजार दर तुरीला मिळत होता. मात्र, नवीन तूर बाजारात येताच दर घसरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांनी हमीभावाचा लाभ घ्यावा. नोंदणी प्रक्रिया सोपी असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रांमध्ये नोंदणी करावी, यासाठी प्रशासन जनजागृती करत आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. - मारोती काकडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलढाणा
येथे आहेत खरेदी केंद्र
बुलढाणा जिल्ह्यात आमडापूर, अंजनी खुर्द, भोरटेक, चिखली, दे.राजा, बिबी, जांभुळधाबा, मेरा खुर्द, माटेरगाव, रोहिणखेड, दुसरबीड, सिंदखेडराजा, बुलढाणा, वरवंट बकाल, हिरडव, जानेफळ, लोणार, मेहकर, मोताळा, पिंपरी खंदारे / किनगाव जडू, संग्रामपूर, शेगाव, सिंदखेडराजा, वडगाव पाटण येथे खरेदी केंद्र आहेत.
काय सांगते आकडेवारी?
हमीभाव (क्विंटल) | ७,५५० |
तुरीची आवक क्विंटल | ६,५२० |
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या | १,७५१ |
तूर खरेदी केंद्रांची संख्या | २४ |
कशी करावी नोंदणी?
* हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर (Portal) नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच, जवळच्या खरेदी केंद्रांमध्ये वेळेवर तूर विक्रीसाठी अर्ज सादर करावा.
* तूर खरेदी केंद्रांवर हमीभावाने तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना निश्चित दर मिळू शकतो. २५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत आहे. नोंदणीला कमी प्रतिसाद मिळत असल्याने मुदत वाढण्याची चिन्हे आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Lakhpati Didi Scheme: राज्यात 'या' जिल्ह्यातील लखपती दीदींची सक्षम घोडदौड