बाळासाहेब माने
तुरीचा नवीन माल (Tur Market) बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे आता येत्या काळात शासकीय खरेदी सुरू होणार असल्याने तुरीला कसा दर मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बाजारात प्रतिक्विंटल १० हजार रुपयांनी विक्री होणारी तूर नवीन माल (Tur Market) आल्याने ७ हजार रुपयांवर आली आहे. शासनाचा तुरीला केवळ ७ हजार ५५० रुपये हमीभाव आहे.
दुसरीकडे सोयाबीन (Soybean) विक्रीवेळी हमीभाव केंद्रात आलेला अनुभव व रखडलेल्या चुकाऱ्यामुळे तुरीच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणीकडेच पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
२२ फेब्रुवारीपर्यंत धाराशिव येथील खरेदी केंद्रावर केवळ दोन शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात फेडरेशनने तूर खरेदीसाठी २१ केंद्रांना मंजूर दिली आहे.
हमीभावाने तुरीच्या विक्रीसाठी २४ जानेवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदत होती. मात्र, जनजागृतीचा अभाव आणि बाजारातील तुरीचा दर घसरल्याने शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद दिसत आहे.
शासनानेही तुरीला अत्यल्प ७ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. एक महिन्यापूर्वी बाजारात १० हजार रुपये प्रतिक्विंटलने तुरीची विक्री झाली. मात्र, नवीन तूर बाजारात येताच ७ हजार रुपयांवर भाव आले आहेत. हमीभाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदीकडे दुर्लक्ष केले आहे.
मुदतवाढीची गरज...
हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जवळच्या खरेदी केंद्रात वेळेवर तूर विक्रीसाठी अर्ज करावा लागतो. २२ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांना माहिती नसल्याने नोंदणी झाली नाही. शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी काही शेतकऱ्यांतून होत आहे.
कशी करावी नोंदणी?
हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच, जवळच्या खरेदी केंद्रांमध्ये वेळेवर तूर विक्रीसाठी अर्ज सादर करावा.
तूर खरेदी केंद्रांवर हमीभावाने तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना निश्चित दर मिळू शकतो. २२ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत आहे. नोंदणीला कमी प्रतिसाद मिळत असल्याने मुदत वाढण्याची चिन्हे आहेत.
०५ केंद्रावर किती नोंदणी
धाराशिव येथील खरेदी केंद्रासह इतर पाच केंद्रावर तूर विक्रीसाठी अत्यंत कमी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याचे केंद्रातील अधिकाऱ्याने सांगितले.
काय सांगते आकडेवारी ?
हमीभाव (क्विंटल) | ७,५५० |
आवक घटली | ०.१ (क्विंटलमध्ये) |
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या | २०७ |
तूर खरेदी केंद्रांची संख्या | २१ |
३ हजाराने घसरले दर !
* तुरीची काढणी सुरू झाली असून, बाजारात नवीन माल दाखल होत आहे. अडत बाजारात कमीत कमी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विक्री बंद केली.
* कडता हमाली जाऊन प्रतिक्विंटल ७ हजारांवर भाव मिळत आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी तुरीला प्रतिक्विंटल १० हजार रुपये दर मिळत होता. नवीन तूर बाजारात येताच ३ ते ३५०० रुपयांनी दर घसरल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.
सोयाबीननंतर हमीभाव केंद्रावर तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने २२ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदत दिली होती. मुदतीत धाराशिव केंद्राअंतर्गत केवळ २ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. - दीपक शेलार, केंद्र अधिकारी, धाराशिव.
हे ही वाचा सविस्तर :